पुणे : माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या वरवरा राव यांना जामीन मंजूर केल्यास ते भूमिगत होण्याची शक्यता आहे. असा लेखी युक्तिवाद पोलीसांनी केला आहे. या कारणामुळे त्यांचा तात्पुरता जामिनाचा अर्ज फेटाळण्यात यावा, असा लेखी युक्तिवाद पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात दाखल केला आहे. गुन्हयाचा तपास सुरू असून राव यांच्यावतीने करण्यात आलेली विनंती मान्य केल्यास तो गुन्हयातील उपलब्ध पुरावा नष्ट करण्याची व धार्मिक विधीसाठी नातेवाईक, मित्र परिवार तसेच तेथील स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. असेही अर्जात म्हटले आहे.
भावाच्या पत्नीचे निधन झाल्याने धार्मिक विधीसाठी तात्पुरता जामीन देण्याचा अर्ज राव यांनी विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात केला आहे. या अर्जावर न्यायालयाने सरकारी पक्ष आणि पोलिसांना आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी त्यांचे म्हणणे सादर केले. राव हे बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) या संघटनेचे वरिष्ठ व सक्रिय नेते आहेत. ते देशविरोधी गुन्ह्यात सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीन दिल्यास ते भूमिगत होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची तात्पुरत्या जामिनाची मागणी फेटाळण्यात यावी, असा लेखी युक्तिवाद न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.
राव यांच्या संरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या पोलिसांना तेथील सर्वच व्यक्ती अपरिचित आहेत. तसेच नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर हल्ला होण्याची शक्यता आहे. नक्षलवादी राव यांना पळून जाण्यास मदत करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांचा हेतू साध्य होईल. तसेच राव हे भूमिगत झाल्यास पुन्हा सापडणार नाही, असे लेखी म्हणण्यात नमूद करण्यात आले आहे. अर्जावर शुक्रवारी (ता.26) सुनावणी होणार आहे. राव यांच्या वतीने अॅड. राहुल देशमुख आणि अॅड. पार्थ शहा यांनी अर्ज दाखल केला आहे.