पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाच्या चौथ्या गुणवत्ता यादीमध्ये १८ हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. शनिवारी (दि. ५) ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असून संबंधित विद्यार्थ्यांना दि. ९ आॅगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.केंद्रीय प्रवेश समितीमार्फत रविवारी चौथी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार होती. मात्र, शनिवारीच ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या फेरीसाठी २२ हजार ६१ विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी १८ हजार ५ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली आहे. पहिल्या पसंतीक्रमानुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७ हजार ८३९ एवढी आहे, तर अद्यापही ४ हजार ५६ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी मिळालेली नाही.गुणवत्ता यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दि. ७ ते ९ आॅगस्ट या कालावधीत संबंधित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येईल. दि. ७ आॅगस्ट रोजी काही महाविद्यालयांना सुटी असणार आहे. ही महाविद्यालये वगळून इतर संस्थांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहे. दि. ९ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंतच प्रवेशासाठी मुदत देण्यात आली आहे. पहिल्या पसंतीक्रमानुसार निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. अन्यथा पुढील फेरीत सहभागी होता येणार नाही. तर इतर विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्यास त्यांना पुढील फेरीतही संधी मिळणार आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली.
चौथ्या यादीत १८ हजार विद्यार्थ्यांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 4:56 AM