लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शिवाजीनगर येथील सीओईपी येथील जम्बो हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीला ऑक्सिजनच शिल्लक नसल्याने, ऑक्सिजन बेड रिक्त असूनही कोरोनाबाधित रुग्णांना प्रवेश नाकारले जात आहेत. कारण बेड आहेत, पण ऑक्सिजन नाही अशी अवस्था जम्बोची झाली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बेड उपलब्धता दर्शविणाऱ्या डॅश बोर्डवर जम्बो हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड शिल्लक असल्याचे दाखवत आहे. परंतु, महापालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधल्यावर बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. तर बेड उपलब्ध झाल्यावर तुम्हाला कळविले जाईल, असे सांगितले जात आहे. आपल्याला बेड उपलब्ध झाल्यावर फोन येईल म्हणून, रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक आपला संपर्क क्रमांक देत आहेत. पण चार-पाच तास झाले तरी अनेकांना फोनच न आल्याने अनेकांनी आपआपल्या भागातील माननीय यांना बेडसाठी फोनाफोनी सुरू केली. त्या वेळी संबंधितांनी महापालिका व जम्बो हॉस्पिटलमध्ये संपर्क साधला असता, बेड आहेत पण ऑक्सिजन नाही म्हणून प्रवेश नाकारले जात असल्याचे सांगितले गेले आहे.
दरम्यान, ही परिस्थिती अन्य हॉस्पिटलमध्ये निर्माण झाली असल्याने बेड असूनही ऑक्सिजन नसल्यामुळे मोठा खोळंबा निर्माण झाला आहे.
-------------
ऑक्सिजनविना हाल
कोरोनाच्या रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला किंवा त्यांची ऑक्सिजनची पातळी खालावली तर त्यांना ऑक्सिजन बेड लागतो. सध्या शहरात अनेक ठिकाणी याचा तुटवडा आहे. ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्याने अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. महापालिकेच्या जम्बो सेंटरमध्येही आता त्याची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.
-----------