पुणे : कोरोनाची साथ मार्च २०२० मध्ये सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील पहिला रुग्ण नायडू रुग्णालयात दाखल झाला. त्यानंतर पुढील दोन वर्षे नायडू रुग्णालयात २०० हून अधिक रुग्णांवर कोरोना उपचार केले जात होते. नायडू रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार केले. तब्बल दोन वर्षांनी ६ एप्रिलला नायडू रुग्णालयात एकही कोरोना रुग्ण नसल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. ६ एप्रिलला डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णाला १ एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या शहरात सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण दाखल नाही.
नायडू रुग्णालय हे कोरोना रुग्णांवर उपचार करणारे ‘महाराष्ट्रातील पहिले रुग्णालय’ ठरले. सुरुवातीच्या काळात रुग्णालयाकडे केवळ २ व्हेंटिलेटर उपलब्ध होते. कोरोना साथीचा उच्चांक गाठला गेलेला असताना नायडू रुग्णालयामध्ये एकाचवेळी २००-२५० रुग्णांवर उपचार केले जात होते. सुरुवातीच्या काळात बेड उपलब्ध नसल्यास अथवा रुग्णाला गंभीर स्वरुपाचा संसर्ग झाला असल्यास रुग्णांना ससून सर्वोपचार रुग्णालयात पाठविले जात होते. नायडू रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांनी सात-आठ तास पीपीई किट घालून रुग्णांवर उपचार केले आहेत. साधनसामग्रीच्या त्रुटींवर मात करत नायडू रुग्णालयाने कोरोनाच्या संकटाशी आजवर लढा दिला आहे.
नायडू रुग्णालयाचे डॉ. सुधीर पाटसुते म्हणाले, ‘कोरोनाच्या प्रादुर्भावास सुरुवात झाली, त्यावेळी रुग्णालयात केवळ दोन व्हेंटिलेटर होते. गेल्या दोन वर्षांमध्ये ही संख्या २० पर्यंत पोहोचली आहे. सध्या एकही रुग्ण नसल्याने दिलासा मिळाला आहे. चौथी लाट येऊ नये, अशीच इच्छा आहे तरी यापुढेही प्रत्येक रुग्णावर उपचार करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी लागणारे प्रशिक्षण कार्यक्रम आजही सुरुच आहेत.’ २१ मार्चपासून नायडू रुग्णालयात एकच कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होता. त्याचा डिस्चार्ज झाल्यानंतर १ एप्रिलला आणखी एक रुग्ण दाखल झाला. त्या रुग्णास ६ एप्रिलला डिस्चार्ज देण्यात आला. आता शहरात केवळ ९८ सक्रिय रुग्ण असून हे सर्व गृहविलगीकरणात असल्याची माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली.