शहरात सायन्स पार्क, दुमजली उड्डाणपूल, चोवीस तास पाणीपुरवठा, विविध रस्ते हे प्रकल्प गेल्या दोन वर्षात पूर्णत्वास गेले. मात्र, काही महत्त्वाचे प्रकल्प अद्यापही रखडलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी स्वस्त घरकुल योजना राबविण्याचा निर्णय महापालिकेने २००९ ला घेतला. यासाठी सुमारे पन्नास हजार जणांनी अर्ज केले. यामध्ये साडेतेरा हजार लाभार्थी निश्चित करण्यात आले. त्यासाठी २०११ला सोडत काढण्यात आली. पहिल्या टप्प्यात ६७२० लाभार्थींना, तर उर्वरित लाभार्थींना दुसऱ्या टप्प्यात घर देण्याचे ठरले. अद्यापपर्यंत पहिल्या टप्प्यातील ३०६६ घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून, यापैकी काही घरांचा ताबाही देण्यात आला आहे. मात्र, उर्वरित घरांचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. लाभार्थी मात्र घर कधी मिळणार याकडेच डोळे लावून बसले आहेत. जागा उपलब्ध नसल्याने दुसरा टप्पा पूर्णत्वास जाईल की नाही अशी स्थिती आहे. २०११ ला सोडत काढल्यानंतर लाभार्थींच्या यादीत नाव आले, तेव्हापासून लाभार्थी घराची आस लावून बसले आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पही अर्धवट स्थितीत आहेत. काही न्यायालयीन प्रक्रियेमुळे तर काहींचे काम संथ गतीने सुरू असल्याने प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास उशीर होत आहे. विठ्ठलनगर येथे १३ इमारतींचा प्रकल्प राबविला जात असून, १० इमारतींतील घरांचे वाटप झाले आहे. निगडीतील सेक्टर क्रमांक २२ येथील प्रकल्प पूर्णत्वाला आला असतानाच तो न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. वेताळनगर येथील प्रकल्पातील ९ पैकी ४ इमारतीतील घरांचे वाटप झाले आहे. निगडी-दापोडी, काळेवाडी-देहू, आळंदी रस्ता, नाशिक फाटा-पिंपळे गुरव, सांगवी-किवळे या चार मार्गांवर बीआरटीएस प्रकल्पाचे नियोजित आहे.
विकासाच्या वाटेवरही अनेक प्रकल्प रखडलेले
By admin | Published: May 02, 2015 5:28 AM