लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासन शंभर टक्के छायाचित्रयुक्त मतदार यादी तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु पुणे जिल्ह्यात अद्यापही तब्बल ३ लाख ७९ हजार ९३३ मतदारांचे यादीत छायाचित्र नाही. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा छायाचित्र नसलेल्या मतदारांची छायाचित्र गोळा करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अद्यावत करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. आयोगाने शंभर टक्के छायाचित्र युक्त मतदार यादी तयार करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला आहे. पुणे जिल्ह्यात ७८ लाख ८७ हजार ८७४ एकूण मतदार आहेत. यापैकी ३ लाख ७९ हजार ९३३ मतदारांची छायाचित्रे यादीत नाहीत. आयोगाच्या या छायाचित्र शोध मोहिमेनंतर देखील ज्या मतदारांचे छायाचित्र मिळणार नाही, अशी नावे यादीतून वगळण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात मतदार यादी शुध्दीकरण मोहिम भारत निवडणूक आयोग यांच्या सूचनांनुसार राबविण्यात येत आहे. त्यानुसार मतदार यादीमध्ये नवीन मतदारांची नोंदणी करणे, मयत, स्थलांतरित दुबार मतदारांची वगळणी करणे, मतदार यादीमध्ये नाव आहे. परंतु फोटो नाही अशा मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे, तार्किक चुकांची दुरुस्ती करणे इत्यादी कामकाज सुरू आहे. यामुळे अशा मतदारांनी ८ दिवसांमध्ये आपली छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे अथवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे जमा करावे.
जे मतदार ८ दिवसांत छायाचित्र जमा करणार नाहीत अशा मतदारांची नावे भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतील. याबाबत संबंधित मतदारांनी नोंद घ्यावी. तसेच छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयामध्ये पडताळणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचे वेबसाईट pune.nic.in / pune.gov.in या ठिकाणी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या यादीचे अवलोकन करुन आपले नाव यादीमध्ये असल्यास येत्या ८ दिवसांमध्ये आपले छायाचित्र संबंधित ठिकाणी जमा करावे. सदर कार्यक्रम कालमर्यादित आहे.
-----
यादीत छायाचित्र नसलेले मतदारांची तालुकानिहाय संख्या
जुन्नर- २८, आंबेगाव- १५३, खेड-आंळदी - ५०३, शिरूर- ११२०२, दौड - ११५८३, इंदापूर- ७११९, बारामती - ०, पुरंदर- ६१८३, भोर - १५८३, मावळ - २२७१, चिंचवड- ७४७६, पिंपरी- १३५२७, भोसरी - ३२४६, वडगाव शेरी - ७०७११, शिवाजीनगर- ३०४७४, कोथरूड- ४६८८९, खडकवासला - ४७७८९, पर्वती- २३५८०, हडपसर- ५०२२२, पुणे कॅन्टोन्मेंट- २९७८५, कसबा पेठ- १५९०९
एकूण- ३७९९३३
------