पुणे : मधुमेहाचे टाईप १ व टाईप २ हे दोन प्रकार नसून पाच प्रकार असल्याचा दावा स्वीडन येथील लूंड विश्वविद्यालयातील डायबेटिक सेेंटरचे संचालक डॉ. लीफ ग्रुप यांनी केला आहे. त्यांनी सुमारे १५ हजार मधुमेह झालेल्या रुग्णांचा वय, उंची यांसह विविध घटकांचा अभ्यास केला आहे.चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित तिसरी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद शनिवारपासून पुण्यात सुरू झाली. त्यामध्ये जगभरातील तज्ज्ञ डॉक्टर व संशोधक सहभागी झाले आहेत. उदघाटनच्या कार्यक्रमानंतर डॉ. ग्रुप यांनी पत्रकार परिषद घेत मधुमेहाच्या पाच प्रकाराची माहिती दिली. या वेळी स्वीडनच्या ओरेब्रो विद्यापीठातील प्राध्यापक व सर्जन डॉ. ओले लेजंगक्विस्ट, यू.के.च्या कार्डिफ विद्यापीठ प्राध्यापिका डॉ. सुझेन वोंग, चेलाराम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. जी. उन्नीकृष्णन हे उपस्थित होते.भारतात केवळ दोन प्रकारचेच मधुमेह माहीत आहेत. याविषयी बोलताना डॉ. ग्रुप म्हणाले, क्लस्टर १ प्रकारामध्ये इन्सुलिनची कमतरता शरीरात असते. क्लस्टर २ मध्ये डोळ्याचे व पायाच्या आजाराची शक्यता जास्त असते. क्लस्टर ३ मध्ये शरीरातील इन्सुलिन नीट काम करत नसल्याने मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात. क्लस्टर ४ हा जास्त लठ्ठपणामुळे होतो. तर क्लस्टर ५ वाढत्या वयामुळे होतो. या प्रकारानुसार रुग्णाला कोणते उपचार, कोणते डायट व कोणता व्यायाम करावा याचाही अभ्यास केला आहे. त्यामुळे मधुमेह आटोक्यात आणणे अधिक यशस्वी ठरत आहे.जगभरातील पंधरा हजार मधुमेहग्रस्त रुग्णांचा अभ्यास केला आहे. त्यातून असे निदर्शनास आले की जगभरात पाच प्रकारचे मधुमेह आहेत. मधुमेहाची या पाच प्रकारात विभागणी केल्यामुळे त्यानुसार त्यांच्यावर उपचार करणे शक्य झाले आहे.- डॉ. लीफ ग्रुप,डायबेटिक सेंटर, लूंड विद्यापीठ, स्वीडन.
जगात मधुमेहाचे दोन नव्हे पाच प्रकार; स्वीडनमधील डॉक्टरांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 3:17 AM