पुणे: शहरातील जवळपास ७५ हजार रिक्षांसाठी फक्त ७०० रिक्षा थांबे आहेत. मागील १० वर्षांत रिक्षांची संख्या दुप्पट होऊनही थांबे मात्र आहे तितकेच आहेत. सोसायट्यांमधील वृद्धांची यामुळे अडचण होत असून पोलीस, वाहतूक पोलीस, महापालिका व आरटीओ अशी चार सरकारी कार्यालये या समस्येशी संबधित असूनही कोणीच यावर काही करायला तयार नाही.मागील काही वर्षांत पुण्यातील प्रवासी रिक्षांच्या संख्येत बरीच मोठी वाढ झाली आहे, त्याचबरोबर पुण्याचा विस्तारही वाढला आहे. त्या प्रमाणात रिक्षा थांब्यांची संख्या मात्र वाढलेली नाही. तब्बल १० वर्षांपूर्वी रिक्षा थांब्यांची संख्या १ हजार होती. त्यातलेही २०० थांबे पिंपरी-चिंचवडमध्ये होते. म्हणजे पुण्यात फक्त ७०० ते ८०० थांबे होते. त्याही वेळी त्यांची संख्या कमीच होती. आता तर त्यावेळेपेक्षा रिक्षा दुप्पट झाल्या आहेत व थांबे मात्र आहे तितकेच आहेत.रिक्षा थांब्यांसाठी वाहतूक शाखेने योग्य जागा पहायची, ती महापालिका प्रशासनाने थांब्यासाठी म्हणून द्यायची, आरटीओने त्याला परवानगी द्यायची व त्या जागेवर अन्य कोणती वाहने लागणार नाहीत याची काळजी पोलिसांनी घ्यायची अशी रिक्षा थांब्यांची सर्वसाधारण पद्धत आहे. इतकी सोपी पद्धत असूनही ही चारही सरकारी खाती या समस्येकडे गंभीरपणे पहायला तयार नाहीत. नागरिकांना या खात्यांच्या सुस्तपणाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातून काही ठिकाणी स्वयंघोषीत रिक्षा थांबे तयार झाले असून तिथे कोणाचेही नियंत्रण नसते. त्यामुळे तिथे रिक्षाचालकांचाच मनमानी कारभार सुरू असतो. जवळचे प्रवासी नाकारणे, मीटर सुरू न करता अवाजवी दर लावणे असे प्रकार तिथे सुरू असतात.......
उपनगरांमध्ये रिक्षा थांब्यांची गरज १ उपनगरांमध्ये रिक्षा थांब्यांची सर्वाधिक गरज भासत आहे. सोसायट्यांमधील वृद्ध व्यक्तींना बाहेर जायचे असेल, तर त्यासाठी रिक्षा हे सर्वांत स्वस्त व सहज उपलब्ध होणारे वाहन आहे, मात्र थांबे नसल्यामुळे तेच मिळण्याची मारामार झाली आहे. २ घरापासून दूरवर चालत जाणे, रस्त्यावर उन्हात थांबून रिक्षाची वाट पाहणे, रस्त्यावरून धावणाºया रिक्षाला आवाज देणे किंवा हात दाखवणे, असे प्रकार वृद्धांना करावे लागतात. त्यातच चालता येणे शक्य नाही, अशी महिला बरोबर असेल तर आणखीच अडचण होते. लांबचा प्रवास असेल तर ओला-उबेर कार परवडतात, जवळच्या अंतरासाठी रिक्षाच सोपी पडते.
प्रशासनच जबाबदाररिक्षा थांबे ही शहराची गरज आहे हे वाहतूक शाखा लक्षात घेत नाही, तोपर्यंत या विषयाचे असेच होत राहणार. आम्हीच पाठवलेली अनेक पत्रे आमच्या दप्तरात असतील. रिक्षा थांबे वाढवा, त्यासाठी शहराची पाहणी करा, रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करा असे अनेकदा प्रशासनाला सुचवले आहे. काहीतरी कायदेशीर कारणे वगैरे सांगून नेहमीच याची टाळाटाळ केली जाते. वयोवृद्ध नागरिकांना रिक्षा मिळवण्यासाठी रस्त्यांवरून पायी चालावे लागणे गैर आहे. स्मार्ट म्हणवल्या जाणाºया शहरात तरी असे होऊ नये, पण तसे होत आहे व त्याची खंत कोणालाही वाटत नाही. - नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षा पंचायत.....शहरात तीनचार रिक्षा संघटना आहेत. त्याशिवाय काही थांबे बरेच जुने असून, तिथे वर्षानुवर्षे थांबणाºया रिक्षाचालकांनी मंडळ वगैरे स्थापन केले आहे. रिक्षा पंचायत ही एक जुनी व बरीच मोठी संघटना आहे. यातील बहुतेक संघटना गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस व प्रशासनाकडे थांबे ठरवून देण्याची, वाढवून देण्याची मागणी करत आहेत, मात्र प्रशासनाने त्यांच्या मागणीला कायमच वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत. वाहतूक शाखेने हे काम प्राधान्याने करायला हवे, मात्र त्यांच्याकडूनच या विषयाला महत्त्व दिले जात नाही, असेच दिसते आहे.४ लोकमतच्या व्यासपीठावर आयोजित रिक्षाचालकांच्या समस्या चर्चासत्रात वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज देशमुख यांनी स्पष्टपणे रिक्षा थांब्यासाठी लवकरच शहराची, उपनगरांची पाहणी करून थांबे वाढवणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी त्यासाठी एक बैठकही घेतली. त्या रिक्षाचालकांनी काही जागाही सुचवल्या. मात्र, त्यानंतर पुढे या विषयात काहीही झाले नाही. पहिले पाढे पंचावन्न याप्रमाणे थांबे आहे तेवढेच राहिले. त्यात एकाही थांब्याची वाढ झालेली नाही.४आहेत त्या थांब्यांची अवस्थाही चांगली नाही. नियमाप्रमाणे एखादा थांबा अधिकृत असल्यास त्या जागेवर दुसरे कोणतेही वाहन लावता येत नाही. ५ रिक्षांची परवानगी असेल तर तेवढ्याच रिक्षा तिथे लावाव्या लागतात. ६ वी रिक्षा लागली तर पोलीस कारवाई करतात, मात्र दोनच रिक्षा असतील व उर्वरित जागेवर कोणी दुसरे वाहन लावले तर त्यांच्यावर मात्र पोलीस काहीच कारवाई करत नाही. वाहनतळाच्या समस्येमुळे काही कारचालक व दुचाकीचालकही रिक्षा थांब्यांच्या जागेवर वाहन लावतात व आपल्या कामासाठी म्हणून निघून जातात. नंतर तिथे आलेल्या रिक्षाचालकांची मात्र त्यांची अधिकृत जागा असूनही वाहन लावण्याची अडचण होते.