पुणे : महापालिकेच्या वतीने सन २०१७-१८चा पर्यावरण सद्य:स्थिती अहवाल बुधवार (दि.२५) रोजी सादर केला. यामध्ये पुण्यात विमान प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याचे स्पष्ट झाले. विमानप्रवासी संख्येत वाढ होत असतानाच, एसटी आणि रेल्वेप्रवासी संख्येत चांगलीच घट झाली असल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट झाले.महापालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये हवा प्रदूषणाचे संभाव्य स्रोत यामध्ये वाहनांची वाढती संख्या, यात विमान, एसटी आणि रेल्वेप्रवासी संख्या आदी विविध गोष्टीची सविस्तर माहिती देण्यात आली. यात पुण्यात गेल्या पाच वर्षांत विमान प्रवाशांच्या संख्येत कशी वाढ होत गेली, याची सविस्तर आकडेवारी दिली आहे. यामध्ये सन २०१७-१८ मध्ये पुण्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर तब्बल ७१ लाख ९९ हजार ८५५ पुणेकरांनी एका वर्षात विमानप्रवास केला. पुण्यातून दररोज २२ हजार ४६६ लोक विमानप्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले. यात गत वर्षाच्या तुलनेत यंदा विमानप्रवासी संख्येत तब्बल ६ लाख ८७ हजारांची वाढ झाली आहे.पुण्यात विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच रेल्वे आणि एसटी बसने प्रवास करणाºयांची संख्या मात्र दिवसेंदिवस घटत असल्याची वस्तुस्थित या पर्यावरण अहवालातून स्पष्ट झाली आहे. यात पुण्यातून सन २०१७-१८ या एका वर्षांत ७७७.२३ लाख लोकांनी रेल्वेने प्रवास केला. हीच संख्या सन २०१६-१७ मध्ये ७९५.३६ लाख एवढी होती. तर एसटीच्या प्रवासी संख्येत देखील मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. सन २०१७-१८ मध्ये पुणे शहरातून राज्य, परराज्यात प्रवास करणाºया पुणेकरांची संख्या १०६८.५८ लाख एवढी आहे. दिवसाला सुमारे २ लाख ९३ हजार लोक एसटीने प्रवास करतात. सन २०१६-१७ च्या तुलनेत प्रति दिन तब्बल ११ हजारांनी एसटीच्या प्रवासी संख्येत घट झाली आहे.
पुण्यात विमान प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 4:25 AM