कामशेत : मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने माळशिरस ते मुंबई पदयात्रेचे कामशेत येथील मुस्लिम समाजाने स्वागत केले. महाराष्ट्र राज्य मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे सुमारे ५० कार्यकर्ते माळशिरसपासून मुंबईकडे पदयात्रा करीत आहेत.
मुस्लिम समाज हा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीयदृष्ट्या मागासलेला असून, या समाजाच्या उन्नतीसाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे कोअर कमिटीने सांगितले. अमीर शेख, नासीर सय्यद, लालखान पठाण, शाहिद शेख, रशीद शेख, अख्तर शेख, सलमान शेख यांचा कोअर कमिटीत सहभाग असून, २ नोव्हेंबरला माळशिरसमधून निघालेल्या या पदयात्रेचे १८ तारखेला मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
रंगनाथ मिश्रा, सच्चर समिती, महेमूद रहमान समितीने दिलेल्या मुस्लिम समाजाचे मागासलेपण व शैक्षणिक घट यावर त्रिस्तरीय समितीची अंमलबजावणी करण्यात यावी. शिक्षण व सरकारी नोकरीत मुस्लिम समाजात १२ टक्के आरक्षण कोटा देण्यात यावा. मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची आर्थिक तरतूद वाढवण्यात यावी. तसेच थेट कर्ज योजनेमार्फत मिळणारी रक्कम दुप्पट करण्यात यावी. उच्च न्यायालयाने मुस्लिम आरक्षणावर दिलेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी. मुस्लिमांसाठी १५ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात यावी आदी प्रमुख मागण्यांसाठी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. कामशेत शहरात आल्यानंतर शौकत शेख, इरफान शेख, इब्राहिम रसुलशेख, अल्लाउद्दीन खान, शकीक अत्तार, शबिर रसुलशेख, सादिक तांबोळी, आमीन शेख, अहमद पटेल, तोफिक शेख, मौलाना उसामा, अशफाक मुलाणी, रहीम शेख आदींनी बांधवांचे स्वागत केले.