लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: कोरोना मुंबईत पुन्हा डोके वर काढू लागला. त्या वेळी मुंबई ड्यूटीला नकार मिळत होता, पण आता सगळे जातात, मुक्काम मात्र कोणाला नको असतो.
सर्वच क्षेत्रांतील कामगारांनी कोरोनाचा असा धसका घेतला आहे. एसटी महामंडळही त्याला अपवाद नाही. त्यातही चालक वाहकांना गाडी घेऊन अनेक ठिकाणी रोजच जावे यावे लागते. तिथे फिरणे होत नसले तरी खाणे पिणे, विश्रांती यामुळे संपर्क येतो व कोरोनात नेमका तोच नको असल्याने लांबची व त्यातही मुक्कामी ड्यूटी करायला चालकवाहक नाखूशच असतात.
मुंबईत कोरोनाने जानेवारी २०२१ पासूनच डोके वर काढायला सुरुवात केली. त्या वेळी एसटीला बेस्टसाठी काही गाड्या चालकवाहकांसह द्यायच्या होत्या. दोघांनाही ८ ते १० दिवस राहावे लागणार होते. त्यामुळेच कोणालाही ही ड्यूटी नको होती. त्या वेळी अनेकांचे मन वळवून तर कधी कारवाईची भीती दाखवून व काही वेळा प्रत्यक्ष कारवाई करून ड्यूटी करायला लावावी लागत होते. आता तशी स्थिती नाही, असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईसाठी पुणे जिल्हा विभागातील विविध आगारांमधून दिवसभरात म्हणजे २४ तासांत ११५ गाड्या जात होत्या. २३० चालकवाहक त्यासाठी लागायचे. आता ३५ गाड्या जातात व ७० चालकवाहक लागतात. त्यांच्याकडून नकार मिळत नाही, मात्र मुक्काम करायचा असेल तर चालकवाहकांची मनधरणी करावी लागते, असे काही आगारप्रमुखांनी सांगितले.
मुंबईत कोरोनाचा जोर वाढल्याने चालकवाहकांना भीती वाटते. घरातले लोकही जाऊ नका म्हणतात. पण असे सर्वांचे ऐकले तर गाड्या रद्द कराव्या लागतील. मागील लॉकडाऊनमुळे घसरलेले एसटीचे आर्थिक चाक अजून मार्गावर आलेले नाही. त्यात गाड्या रद्द करणे शक्य नाही. त्यामुळे कोणालातरी तयार करून पाठवावेच लागते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोट
“मुंबईतील ड्युटीला म्हणजे ‘बेस्ट’ला जाण्यास नकार असायचा. एसटीसाठी नाही. आता तर मुंबईमार्ग व्यवस्थित सुरू आहे. मुक्काम असला की काही अडचणी येतात, मात्र त्यावर मार्ग काढला जातो.”
-ज्ञानेश्वर रणावरे, विभागीय वाहतूक नियंत्रक, पुणे जिल्हा
कोट
“चालकवाहकांवर प्रशासन जबरदस्ती करते. त्यांच्या मर्जीतील लोकांना मुंबई ड्युटी लावली जात नाही.”
-रमेश शिंदे, पुणे विभागीय सचिव, इंटक
कोट
“ड्यूटी आहे तर करावी लागणारच. आम्ही नकार देतो, पण कारवाईची भीती असतेच. पुन्हा फार वेळा नकार देता येत नाही. कधीतरी मुंबई ड्युटी करावीच लागते.”
-चालक, पुणे आगार.