पुणे : लॉकडाऊननंतर शिथिल झाल्याने बहुतांशी अटी व कोरोना प्रतिबंधात्मक लस बाजारात आल्याने अनेक नागरिक बिनधास्त झाले आहेत़ पण गेल्या काही दिवसांपासून हवामानात होत असलेले चढउतार यामुळे शहरातील सर्दी खोकल्याचे रुग्णही वाढले असून, कोरोनाबाधितांची संख्याही गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने वाढत आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी शहरात नव्याने २५८ कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ सर्दी खोकल्याचे रुग्णांचे प्रमाण व कोरोनाचा संशय यामुळे तपासणीचा आकडाही शहरात दररोज साडेतीन ते चार हजारांच्या आसपासच कायम आहे़ आज दिवसभरात ३ हजार ३८२ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ७़ ६ टक्के इतकी आहे़ सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रुग्णांलयांमध्ये १३५ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २३७ इतकी आहे़ आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७९४ इतकी झाली आहे़ शहरातील सक्रिय रूग्णसंख्या ही आजमितीला १ हजार ५२० इतकी आहे़
शहरात आजपर्यंत १० लाख ६४ हजार ७०० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९४ हजार ३०९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ८७ हजार ९९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़
==========================