पुणे : 28 नाेव्हेंबरची दुपार पाटील इस्टेट झाेपडपट्टीवासीयांचे संसार उद्वस्थ करणारी हाेती. शाॅक सर्किटमुळे लागेल्या अागीने राैद्र रुप धारण करत शेकडाे झाेपड्यांना अापल्या कवेत घेतलं. काळ्या धुराने अाकाश व्यापून गेलं हाेतं. तब्बल चार ते पाच तासानंतर अग्निशमन दलाला अागीवर नियंत्रण मिळविण्यात यश अाले. अाग विझल्यावर जेव्हा इथल्या रहिवाश्यांनी अापल्या घराकडे धाव घेतली तेव्हा फक्त पांढरी राख राहिली हाेती. तब्बल 17 दिवसांनी येथील रहिवाशांचे संसार राखेतून उभे राहत अाहेत. येथील रहिवाशांनी पुन्हा एकदा अापली घरे उभारण्यास सुरवात केली अाहे.
पाटील इस्टेटला लागलेली अाग ही गेल्या काही वर्षातील सर्वात माेठी अाग हाेती. अग्निशमन दलाला ब्रिगेड काॅल देण्यात अाला हाेता. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे सर्व फायर इंजिन तसेच कॅन्टाेन्मेट बाेर्ड, पीएमअारडीए, बाॅम्बे सॅपर्स अशा सर्वच यंत्रणांच्या फायर गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या हाेत्या. या ठिकाणी असलेल्या चिंचाेळ्या बाेळा अाणि नागरिकांची गर्दी यांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना अाग विझवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत हाेता. फायर गाडी अाग लागली त्या ठिकाणी पाेहचू न शकल्यामुळे लांबूनच अागीवर पाण्याचा मारा करावा लागला. येथील स्थानिक तरुणांनी देखिल अग्निशमन दलाच्या जवानांना अाग विझविण्यात मदत केली. एकामागाेमाग एक सिलेंडरचे स्फाेट हाेत असल्याने अाग अाणखीनच भडकत हाेती. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला अाग विझविण्यात यश अाले हाेते. यात कुठलिही जीवित हानी झाली नसली तरी माेठ्याप्रमाणावर झाेपड्यांचे नुकसान झाले. शेकडाे झाेपड्यांमध्ये केवळ राख उरली हाेती.
अाता सतरा दिवसांनंतर याठिकाणच्या लाेकांचं जनजीवन हळूहळू पुर्वपदावर येत अाहे. येथील बहुतांश लाेकांनी पुन्हा एकदा घरे बांधण्यास सुरुवात केली अाहे. इथल्या लाेकांनी स्वतः कुदळ, फावडे हातात घेऊन अापली घरे बांधण्यास सुरुवात केली आहे. लहानग्यांपासून ते वयाेवृद्धांपर्यंत सर्वचजण कामाला लागले अाहेत. पुन्हा एकदा घर बांधून संसार उभा करण्याची स्वप्ने इथले नागरिक अाता बघत अाहेत. शांताबाई कांबळे म्हणाल्या, अागीत अामच्या घरातील सर्व जळून खाक झालं हाेतं. काेणाचीच मदत अाम्हाला मिळाली नाही. अाता अाम्ही स्वतःच जमवलेल्या पैशातून अामचं घर उभं करत अाहाेत.