डॉक्टरांचे निरीक्षण : महिलांनी अधिक लक्ष देण्याची आवश्यकता
शरीरातील वाढती उष्णता, पाण्याची कमतरता यामुळे मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. मूत्राशय भरल्यासारखे वाटणे, सतत लघवीला होणे, मूत्रोत्सर्जन करताना वेदना होणे, दाह होणे, लघवीचा रंग गडद असणे, लघवीमध्ये रक्ताचे प्रमाण असणे, उग्र वास येणे, महिलांच्या ओटीपोटात दुखणे अशा प्रकारची लक्षणे मूत्रमार्गाचा संसर्गामध्ये दिसून येतात. हे त्रास जाणवू लागल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास निदान होऊन योग्य उपचार घेतल्याने तो कमी होऊ शकतो. परंतु, या त्रासांकडे दुर्लक्ष केल्यास संसर्ग वाढत जाऊन आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात.
महिलांमध्ये योनीमार्गाचा संसर्ग होण्याची अनेक कारणे आहेत. जिवाणू व बुरशी ही योनीमार्गाचा संसर्ग होण्याची दोन प्रमुख कारणे. योनीमार्गातील त्वचा कायम ओली राहिली, नियमितपणे स्वच्छ केली गेली नाही किंवा जंतुसंसर्ग असलेल्या साथीदारासोबत लैंगिक संबंध ठेवल्यास जिवाणूजन्य संसर्गाचा धोका असतो. याशिवाय योनीमार्ग अस्वच्छ राहिल्यास अनेक स्त्रियांना विशेषत: मधुमेही स्त्रियांनाही योनीमार्गात कॅण्डिडा या बुरशीमुळे दाह सहन करावा लागतो. या संसर्गात लघवी होण्यास सुरुवात झाल्यावर वेदना होतात. अशा प्रकारचा त्रास १५ ते ४५ या वयोगटांतील महिलांमध्ये अधिक दिसतो.
डॉ. सूरज लुनावत म्हणाले, ''वारंवार लघवी होणे, जास्त काळ मूत्र धरून ठेवणे आणि अस्वच्छतेमुळे युटीआय संसर्गाचा सामना करावा लागू शकतो. योनीमार्गात जास्त घाम यणे हे देखील जंतूसंसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. यूटीआयशी निगडित सर्वात सामान्य जीवाणू म्हणजे एशेरिचिया कोलाई हा आहे, हा जीवाण संक्रमणास जबाबदार आहे. कोणत्याही वयोगटातील महिलांना याचा त्रास होऊ शकतो. गेल्या काही महिन्यांमध्ये अशाप्रकारच्या तक्रारी घेऊन येणा-या रुग्णांमध्ये वाढ झाली असून गेल्या काही महिन्यांमध्ये ५० ते ६० रुग्णांमध्ये मूत्रमार्ग संसर्गासंबंधी तक्रारींवर उपचार करण्यात आले.''
-------
यूटीआय संसर्गाच्या समस्येकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर पायलोनेफ्रायटिस (मूत्रपिंडाचा दाह) किंवा सेप्सिससारखी गंभीर गुंतागूंत होऊ शकते. म्हणून, एकदा लक्षणे दिसल्यास उपचारास विलंब करू नका.
- डॉ. सूरज लुनावत
-----------
लघवी करताना जळजळ व वेदना होत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मधुमेह असल्यास किंवा मूतखड्यासारखी समस्या असल्यास संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. वेळी चाचणी केल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो. अन्यथा या समस्येचा मूत्रपिंडावर देखील दुष्परिणाम होतो. कोविड -१९ सारख्या महामारीच्या काळातही तुम्ही घरबसल्या मूत्रविकारासंबंधी चाचणी करू शकता.
- डॉ. संजय इंगळे
--------
काय काळजी घ्यावी?
१. टाळाटाळ न करता वेळीच लक्ष द्या. २.यूटीआय संसर्ग टाळण्यासाठी, भरपूर पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा.
३.जास्त काळ मूत्र रोखून धरणे टाळा.
४. अंतर्वस्त्र वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवा.
५. सार्वजनिक शौचालयाचा वापर शक्यतो टाळा.
६. नाजूक भागावर रसायनांचा वापर करु नका.
७.मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी नॅपकीन वेळोवेळी बदलत आहात, याची खबरदारी घ्या.