मूळ पवार व बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 06:32 AM2024-04-12T06:32:15+5:302024-04-12T06:32:56+5:30
शरद पवार : खडसेंना त्यांनी कुटुंब चालवणं अवघड केलं
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मूळ पवार व बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांचा रोख असावा, अशी चर्चा आहे. ‘एकनाथ खडसे यांना मीच तुम्हाला जिथे सोयीस्कर वाटते, तिथे जा, असे सांगितले, त्यांच्या इतक्या चौकशा त्यांनी सुरू केल्या, व्यक्तिगत संपत्ती जप्त केली, की त्यांना कुटुंब चालवणंसुद्धा अवघड करून टाकलं,’ असे ते म्हणाले. खडसे यांच्याकडून विधान परिषदेची आमदारकी परत घेणार नाही. कारण एकदा दिलेले मी परत घेत नाही, असेही पवार म्हणाले.
शरद पवार गटाच्या शहर कार्यालयात पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, राज ठाकरे यांनी आधी भाजपविरोधात कठोर भूमिका घेतली, त्याला विरोध केला, आता पाठिंबा देत आहेत. नक्की काय आहे, ते काही दिवसांतच पुढे येईल.राज्यातील राजकीय परिस्थिती दररोज बदलत आहे असे सांगून पवार म्हणाले, की धैर्यशील मोहिते- पाटील आमच्या गटात येत आहेत. १४ एप्रिलला त्यांचा पक्षप्रवेश होईल. अन्य अनेक लोक येऊ इच्छित आहेत. लोकांशी बांधिलकी ठेवायची असेल, तर आता आहे तो पक्ष बदलण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांना वाटत असेल, त्यामुळेच कशाचीही अपेक्षा न ठेवता लोक आमच्या पक्षात येत आहेत. शाहू महाराज चांगले काम करत आहेत. राजघराण्यात दत्तक घेण्याची प्रथा आजची नाही. यावर जे कोणी बोलले आहे, त्यांची मानसिकता काय आहे, ते त्यावरून दिसून येते, असेही शरद पवार म्हणाले.