राजू इनामदारपुणे : देशाला जगाबरोबर ठेवण्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच धार्मिक, जातीय विद्वेषाने सध्याच्या काळात देश पोखरला जात असताना काँग्रेस स्वस्थ बसूच शकत नाही. प्रशांत किशोर चर्चेत आहेतच, पण त्याशिवायही काँग्रेसमध्ये बरेच काही घडत आहे, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अंशुल अविजित ‘लोकमत’शी बोलताना आपली भूमिका मांडत होते. धार्मिक विद्वेषाचा आम्ही एकमताने सामना करणारच. अखेर विजय आमचाच होईल, असा विश्वास अविजित यांनी व्यक्त केला.
अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले, केंब्रिजमधून डॉक्टरेट केलेले अविजित हे लोकसभेच्या माजी सभापती मीराकुमार यांचे पुत्र. खासगी कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. शनिवारी दुपारी त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली.
प्रश्न : काँग्रेसची राजकीय पीछेहाट का झाली?अविजित : काँग्रेसचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचत नाही, असे आमच्या लक्षात आले आहे, त्याची कारणेही समजली आहेत, तसेच काँग्रेसनेच या काळात पुढाकार घेऊन देशाला भविष्यात हानी पोहोचविणाऱ्या शक्तीपासून वाचवायला हवे, हेही आता सर्वांना पटले आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रेस समर्थपणे देशात उभी राहिलेली दिसेल. आम्ही काम सुरू केले आहे. वाढते धार्मिक ध्रुवीकरण मात्र चिंताजनक आहे व त्याचा समर्थपणे सामना करण्याची जबाबदारी काँग्रेसचीच आहे.निष्ठावान नेत्यांना बाजूला ठेवून व्यावसायिक रणनीतीकार आणल्याने सुधारणा होईल? तेवढेच सुरू आहे असे नाही. ज्येष्ठांना बाजूला वगैरे ठेवलेले नाही, नवी पिढी कोणत्याही पक्षात येतच असते. तशी ती काँग्रेसमध्येही आली, एवढाच अर्थ आहे.
काय करणार आहे काँग्रेस?सामान्य माणसांचे हित, जातीपातींना वाव नाही, धर्माच्या आधारावर नाही, माणूस म्हणून विचार करून धोरण आखणी हा काँग्रेसचा मूलभूत विचारच आम्ही विसरलो होतो. आता थेट नागरिकांमध्ये जाऊन या सर्व गोष्टी समजावून सांगणार आहोत.
या देशाचे अर्थकारण हाच सध्या चिंता करण्यासारखा विषय आहे. आर्थिक विषयावर झालेल्या संपूर्ण पराभवामुळेच भाजपा सरकार कधी हिजाब, कधी मांसाहार असे मुद्दे उपस्थित करीत आहेत. महाराष्ट्रातून आता त्याला भोंग्यांची साथ मिळत आहे. - अंशुल अविजित