पुणे : आजच्या राजकीय घडामोडींना घटनात्मक किंवा कायदेशीर दृष्टिकोनातून पाहण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल, पण यामध्ये तत्त्व नावाचा प्रकार औषधालाही शिल्लक नाही, हे मात्र खरे, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले, तर त्यांनी हिंदुत्व सोडले, अशी टीका भारतीय जनता पक्ष व शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) यांनी केली. आता राष्ट्रवादी काँग्रेसला सरकारमध्ये घेताना हिंदुत्व कोणी सोडले, असा प्रश्न पडू नये का? असेही बापट म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पडली तशीच फूट आता राष्ट्रवादीमध्ये पडलेली दिसते आहे, मात्र ही फूट अजून स्पष्ट व्हायची आहे. ९ जणांनी मंत्री म्हणून शपथ घेतली असली तरी अन्य आमदारांच्या भूमिका अद्याप स्पष्ट झालेल्या नाहीत. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘माझ्याबरोबर काही आमदारांनी संपर्क केला असून, त्यांनी आपली भूमिका वेगळी आहे असे सांगितले आहे’, असे जाहीर केले आहे. त्यामुळे घटनेच्या व कायद्याच्या कसोटीवर विचार करण्याआधी थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल, असेही प्रा. बापट म्हणाले.
लाेकांचा निर्णय अंतिम :
शरद पवार यांनी ‘आपण लोकांमध्ये जाणार’ असे म्हटले आहे, ते एका दृष्टीने बरोबर आहे; कारण लोकशाहीत लोकांनी घेतलेला निर्णयच अंतिम असतो, असेही प्रा. बापट म्हणाले.