लोणी काळभोर : सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत, यासाठी एकीकडे ‘राइट टू पी’ ही जनचळवळ उभी राहिली आहे. मात्र, दुसरीकडे अस्वच्छ व अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे लोणी काळभोर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.ग्रामपंचायत लोणी काळभोर हद्दीतील सार्वजनिक शौचालये जीर्ण अवस्थेत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहेत. नागरिकांना प्रचंड दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. यामुळे ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ असे म्हणायची वेळ नागरिकांवर आली आहे. लोणी काळभोर गावातील सार्वजनिक शौचालये सध्या जनावरे बांधण्याचा गोठा झाला असून शौचालयाची दरवाजे सडून तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामध्ये पाण्याची व्यवस्था नसून शौचालयाची भांडी मोडलेली आहेत.रहिवाशी प्रात:विधीसाठी अनेकदा मोकळ्या मैदानावर जात होते. सर्वत्र दुर्गंधी पसरण्यासह आरोग्याच्या समस्या निर्माण होत होत्या यासाठीच सुलभ शौचालय उभी केली होती. परंतु, शौचालयाच्या अवस्था दयनीय झाल्याने नागरिक पुन्हा मोकळ्या जागेवर प्रात:विधीसाठी जाऊ लागल्याने सार्वजनिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण होऊ लागले आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टीच्या मराठा सेलचे हवेली तालुकाध्यक्ष गोरख मोरे यांनी केली आहे. ग्रामस्वछता अभियान फक्त नावापुरतेच शौचालयांची दुरवस्था असल्याने अनेक भागातील रहिवासी इच्छा नसताना रात्रीच्या अंधारात उघड्या मैदानात शौचालयास जातात. काही जण शौचालयांबाहेरच लघु शंका करतात. तर आठवडे बाजारात शौचालयांची व्यवस्था नसल्याने खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडूनही मोकळ्या जागांचा वापर होतो. यामुळे सरकारच्या हागणदारीमुक्त उपक्रमाचे तीन तेरा वाजत आहेत. ग्रामसेवक व ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने ही समस्या होत आहे, असा नागरिक आरोप करीत आहेत.
दैनंदिन वापरात असलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे ग्रामपंचायत कामगारांकडून स्वच्छ ठेवली जातात. तसेच वापरत नसलेल्या स्वच्छतागृहांची परिस्थिती पडताळून त्यासाठी पुढील उपाययोजना केल्या जातील. स्वच्छतागृहांच्या अडचणीसाठी ग्रामपंचायतीला कुठल्या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. - भरत काळभोर, सरपंच, लोणी काळभोर