पुणे : कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणानंतर ते ‘बाळ’ लगेच जामिनावर सुटले. बाल न्याय मंडळाच्या या निर्णयामुळे पोलिस प्रशासनावर सर्वसामान्यांमधून संशय व्यक्त केला जात आहे. परिस्थिती अतिशय गंभीर असताना अपघातानंतर त्या ‘बाळा’ला येरवडा पोलिस ठाण्यात पिझ्झा-बर्गर ऑनलाइन ऑर्डर करून खाण्यासाठी दिल्याने पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. या घटनेला चार दिवस उलटून गेल्यानंतरही संबंधित पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर पोलिस आयुक्तांनी कारवाई का केली नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात होता. अशातच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे.
‘बाळा’ने त्याला भरधाव कारने दोघांना उडवल्यानंतर, पोलिसांनी त्या ‘बाळा’ला येरवडा पोलिस ठाण्यात आणले. तोपर्यंत त्याचा परिवार पोलिस ठाण्यात पोहोचला होता. त्यानंतर त्या ‘बाळा’ला भूक लागली म्हणून पिझ्झा-बर्गर खाण्यासाठी मागवला, अशी माहिती मयत तरुणांच्या नातेवाईकांनी दिली. यानंतर पोलिस प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. स्वत: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिस ठाण्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे यांना नियुक्त करण्यात आले. गृहमंत्र्यांनी २४ तासापेक्षा आधी दिलेल्या आदेशानंतरही अद्याप यातील सत्यता समोर आलेली नाही. यामुळे या अधिकारी-कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात असल्याची चर्चा पुणेकरांमध्ये आहे. अपघात घडून आज पाच दिवसांनंतरही बाळाला पिझ्झा-बर्गर कोणी खाऊ घातले याचे चार तासांचे फुटेज बघण्यासाठी एवढा वेळ लागत असेल तर साहजिकच पोलिसांवरील संशय वाढणे स्वाभाविक असल्याचे बोलले जात आहे.
अमितेश कुमार यांना येरवडा पोलीस ठाण्यातील पिझ्झा बर्गर प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले कि, पिझ्झा पार्टी झाल्याचं तपासात आढळून आलं नाही, त्या आरोपात अजिबात तथ्य नाही. येरवडा पोलीस ठाण्यात काय घडलं याची चौकशी केली जात आहे. ब्लड रिपोर्टबाबत काय झालं? असे विचारले असता ते म्हणाले, ब्लड रिपोर्ट अजूनही आले नाही. डीएनए प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते मिळणार नाहीत. मात्र ते दारू पितानाचे सिसिटीव्ही आमच्यकडे आहेत. त्याचीही चौकशी सुरु आहे. तसेच वडील आणि मुलाच्या दोन्ही केसचा तपास संवेदनशीलतेने सुरु आहे. लहान मुलांना दारू देणे, पालकांनी त्याला गाडी देणे, या सर्व बाबतीत क्राईमबरंच कडून तपास सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. आपल्या कृत्यामुळे अपघात होईल याची आरोपीला जाणीव होती. आरोपी बाहेर पडल्यापासूनच्या घटनाक्रमाचाही तपास सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे तसेच या दोन्ही केसचे पुरावे नष्ट झाले का याची चौकशी सुरु आहे.