देशात तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधानपदाची संधी मिळेल असे वातावरण- उपमुख्यमंत्री अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 05:58 PM2024-02-04T17:58:47+5:302024-02-04T17:59:26+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ‘व्हीजन’ आहे, त्यांना दुरचीदृष्टी आहे. संपुर्ण जगातदेखील त्यांची वेगळी प्रतिमा आहे.
बारामती- देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची संधी मिळेल असच वातावरण आहे. कारण त्यांच्याकडे ‘व्हीजन’ आहे. त्यांना दुरचीदृष्टी आहे. संपुर्ण जगात देखील त्यांची वेगळी प्रतिमा आहे. त्यांच्यामुळे आपल्या देशाची वेगळी प्रतिमा उंचावल आहे. देशाला महत्व प्राप्त झाले आहे. परदेशात होणारे त्यांचे स्वागत आपण पाहिले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी त्यांनी शरद पवार गटावर निशाणा साधला.
बारामती येथे आयोजित बारामती व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात बोलताना पवार यांनी मोदींच्या नेतृत्वावर स्तुतीसुमने उधळली. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी देशात वेगवेगळे राष्ट्रीय महामार्ग, वंदेमातरम, फ्लाय ओव्हर, विमानतळ अशा खुप काही गोष्टी उभा केल्या. शेतकऱ्यांसह विविध घटकातील नागरीकांना अनेक योजनांच्या माध्यमातून मदतीचा हात दिल्याचे पवार यांनी नमुद केले.
बदललेल्या राजकीय भुमिकेबाबत भाष्य करताना पवार म्हणाले, विरोधी पक्षात असताना एकनाथराव शिंदे यांनी वेगळी भुमिका घेतली. एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या वरीष्ठांचा काय निर्णय झाला, याबात माहिती नाही. त्यानंतर सातत्याने पन्नास खोके एकदम ओके, गध्दार सारखे वेगवेगळे शब्द वापरुन एकनाथ शिंदे यांना ‘नको नको’ केेले. ते वैतागुन गेले होते.
आपण वेगळी भुमिका केल्यावर कोणी एक अक्षर आरोप केला नाही. मी एकट्यानी ती भुमिका घेतली नाही, सगळे ती भुमिका घेणार होते. मला पुन्हा पुन्हा कोणाला ‘ओपन’ करायच नाही, पण सगळे ती भुमिका घेणार होते. सगळ्यांचे पत्र होते. यामध्ये थांबलेले दहा अकरा आमदार देखील होते, ही वस्तुस्थिती आहे. मध्यंतरी सव्वा वर्षे सरकारमध्ये नव्हतो, त्यामुळे एकदम कामे थांबली. सरकारमध्ये गेल्यानंतर थांबलेल्या कोट्यावधींच्या कामांना गती मिळाली. मात्र,आम्ही सर्वांनी विचारधारा सोडलेली नाही. सेक्युलर ही आपली विचारधारा आहे, शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेवून आपण पुढे चाललो आहोत, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
उद्या खासदारकीचा उमेदवार दिल्यानंतर जर यदाकदाचित मला मिठाचा खडा लागला तर आमदारकीच्या बाबत वेगळा विचार करेन, कोणाच्या बापाच एकणार नाही. मी सरळ सांगेन माझ्या शब्दाला साथ न मिळाल्यास काय उपयोग, एवढे कष्ट मी माझ्या धंद्यात घेतल्यास, काळी ६ते रात्री १० पर्यंत माझा ‘बिझनेस’ बघितल्यास हेलीकाॅप्टर, विमानात फिरेन. मी जे काम करतो, तेवढे कोणीच माइचा लाल करु शकत नसल्याचा दावा अजित पवार यांनी केला. कदाचित कोणी डोळ्यात पाणी आणुन रडतील. पण काम करु शकणार नाही.त्यामुळे कामाच्या पाठीशी उभा रहायचे,की बारामतीच्या चाललेल्या विकासाला साथ द्यायची, विकासाला खिळ घालायची, याचा निकाल बारामतीकरांनो तुम्हाला घ्यायचा आहे, असे परखड आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले
एनडीए त ४८ जागांपैकी कोणती जागा कोणाला द्यायची,याबाबत वरीष्ठ पातळीवर निर्णय घेणार.मात्र, आपण जी राजकीय भुमिका घेतली,त्या पक्षाचा उमेदवार खासदारकीला इथ उभा करणार आहे.त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वेगवेगळे विचारांच्या उमेदवाराला मतदान करण्याची दोन डगरीवर हात ठेवण्याची भुमिका मान्य नाही.द्यायचे असेल तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत माझ्याच उमेदवाराला मतदान करा, त्यामुळे विकासाची गती वाढेल,असा शब्द देतो, असंही ते यावेळी म्हणाले.