धनकवडी : शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे खरे जरी असले तरी वाढत्या वयामुळे येणाऱ्या जबाबदाऱ्या या इच्छा असून देखील शिक्षण घेता येत नाही. परंतु वाढत्या वयाच्या सर्व जबाबदाऱ्या केंद्रीय प्रशासनाची नोकरी करता असताना सुनीता कालिदास महाडेश्वर (वय ५४) यांनी वयाच्या पन्नाशीत देखील दहावीची परीक्षा देऊन पहिल्याच वेळी ५०%गुण मिळवून उत्तीर्ण होऊन दाखवले.
सुनिता महाडेश्वर या आयकर विभागात नोटीस सर्व्हरचे काम करत आहेत. त्यांच्या मनात अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी प्रौढ शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊन दहावीच्या परीक्षेची तयारी सुरू केली. अनेक अडचणींवर मात करत अर्धवट अखेर सुनीता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
सुनिता महाडेश्वर यांच्या पतीचे १९९४ मध्ये ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्या अनुकंपा तत्वावर आयकर विभागात कामाला लागल्या होत्या. त्यांच्या बरोबर मुलगा सून आणि सहा वर्षांचा नातू आहे. तो आता पहिलीत आहे.
सुनिता बिबवेवाडी येथे राहातात, मुलगी असल्यामुळे पाचवी नंतर त्यांचे शिक्षण थांबले होते ती रुखरुख कायम मनात होती. लग्नानंतर पतीचे अकाली निधन झाले. पतीच्या जागेवर त्या कामाला लागल्या आणि परत शिक्षण घेण्याची इच्छा निर्माण झाली. आता पहिल्या प्रयत्नात दहावी उत्तीर्ण होत ती पुर्ण केली.