पुणे : ‘‘उध्दव ठाकरे यांची आम्हाला आता गरज नाही. कारण अजित पवार आमच्यासोबत आले आहेत. ते आल्याने सरकारला स्थैर्य आले आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हे योग्य आहे. आम्हाला आता उध्दव ठाकरे यांची अजिबात गरज नाही, त्यांनी गद्दारी केली आहे, त्यामुळे त्यांचा विषयच आता नाही,’’ असे स्पष्टीकरण भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिले.
पुणे पुस्तक महोत्सवासाठी आयोजित एका कार्यक्रमासाठी शनिवारी तावडे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आले होते. तेव्हा पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी त्यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलणार नाही, असेही म्हटले. मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले, आताचे सरकार अतिशय योग्य काम करत असून, योग्य तोडगा त्यावर लवकरच निघेल. ते ओबीसीमधून द्यायचे की आणखी काेणत्या माध्यमातून ते ठरवतील. येत्या काळात ते दिसून येईल.’’
सध्या देशात भाजपला चांगले यश मिळत आहे. इंडिया आघाडीला मुळातच यश मिळणार नाही. कारण जागांवरून वाद होऊ शकतो. पंजाबमध्ये ते मान आम्ही जागा देणार नाही, असे बोलले तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले की आम्ही काँग्रेसला जागा देणार नाही, त्यामुळे इंडिया आघाडी यशस्वी होणार नाही, असे वाटते,’’ असे तावडे यांनी सांगितले.