गाढलेल्या मुडद्यांवर राजकारण करायचंच नाही, सावरकर वादावर करुणा मुंडेंची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 05:29 PM2022-11-18T17:29:36+5:302022-11-18T17:31:00+5:30
करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली.
मुंबई - काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेनं राहुल गांधींच्या विधानाचं कुठलंही समर्थन केलं नसून ते विधान चुकीचंच आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यानंतर, संजय राऊत यांनीही राहुल गांधींचं ते विधान महाविकास आघाडीला धोका पोहोचवणारं असल्याचं म्हटलं आहे. तर, काँग्रेसच्या काही नेत्यांनाही ते विधान रुचलं नसल्याचं ते म्हणाले. यावरुन राज्यात चांगलाच वाद सुरू असून आता माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडे यांनीही या वादावर स्पष्टपणे भूमिका मांडली आहे.
करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली. राहुल गांधींकडे कुठलाही अजेंडा नसल्याचे म्हटले. त्यासोबतच, आपण सध्या राज्यात सुरू असलेल्या सावरकर वादावर आपली भूमिका स्पष्ट केली. राहुल गांधींनी विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यावरुन, भाजपसह शिंदे गट आणि मनसेही आक्रमक झाली आहे. यासंदर्भात बोलताना करुणा मुंडेंनी म्हटले की, मला त्याबाबत काहीही विधान करायचं नाही. कारण, देशात, राज्यात अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारी, नोकरी, महागडे शिक्षण, महिलांवरील अन्याय-अत्याचार यासह विविध प्रश्न आहेत. त्यामुळे, गाढलेल्या मुदड्यांवर मला राजकारण करायचं नाही, असे स्पष्टपणे करुणा मुंडेंनी म्हटले. या वादावर मला काहीही विधान करायचं नाही, असेही त्यांनी म्हटले.
करुणा मुंडेंनी पुण्यात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी, आपणही पदयात्रा सुरू करणार आहोत. राज्यातील नेतृत्व गुण असलेल्या वंचित युवकांना आपल्यासोबत घेऊन आपण राजकीय प्रवासाची सुरुवात करणार असल्यचं त्यांनी म्हटलं. यावेळी, जर शिंदे गटाने आपल्या विचारधारेशी जुळवणी केली, तर आपण त्यांच्यासोबतही जाऊ, असे त्यांनी सांगितले.
गृहमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना इशारा
काँग्रेस खासदार राहुल गांधी जे काही करतायेत. त्याबाबत कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी केले तर ठीक. पण कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन काय करत असतील तर त्याच्यावर आम्हाला कारवाई करावी लागेल. आम्ही भारत जोडो यात्रेला सुरक्षा पुरवली आहे. त्यांची यात्रा सुरक्षित राज्याबाहेर पाठवू. परंतु महाराष्ट्रातील वातावरण त्यांना बिघडवू नये असा सूचक इशाराही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. गुजरातच्या भावनगर येथे फडणवीस निवडणूक प्रचाराला गेले होते.