ना हरकत नसल्याने घोडगंगाला कर्ज मिळण्यात अडचणी; अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 01:37 PM2024-11-18T13:37:56+5:302024-11-18T13:42:03+5:30
न्हावरे : घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला ज्या बँकांनी कर्ज दिले. त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र कारखाना प्रशासनाने घेतले नाही, तसेच ...
न्हावरे : घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला ज्या बँकांनी कर्ज दिले. त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र कारखाना प्रशासनाने घेतले नाही, तसेच कारखान्याचे भागभांडवल कमी आहे. कर्जशक्ती कमी असल्यामुळे घोडगंगाचा एनसीडीसीचा कर्ज प्रस्ताव मान्य केला जात नाही. ही खरी वस्तुस्थिती आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून घोडगंगाचे एनसीडीसीचे कर्ज मंजूर करून हा कारखाना सुरू करणारच, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.
न्हावरे (ता. शिरूर) येथे महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, प्रदीप गारटकर, प्रदीप कंद, राहुल पाचर्णे निवृत्ती अण्णा गवारी सुरेश घुले, दिलीप वाल्हेकर, स्वप्नील ढमढेरे, स्वप्नील गायकवाड, मोनिका हारगुडे, वैशाली नागवडे जाकीरखान पठाण, अनिल काशीद, शशिकांत दसगुडे, राजेंद्र जासूद, राजेंद्र जगदाळे, आबा सोनवणे, जितेंद्र बढेकर, चंदन सोंडेकर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, विरोधी उमेदवार घोडगंगा कारखान्याच्या संदर्भात मला विनाकारण टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत; पण मतदारसंघातील जनतेने खरी वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची २०२४ ची आर्थिक स्थिती पाहता घोडगंगा कारखान्यावर २९० कोटी रुपये देणे आहे. ६४ कोटी रुपयांचा तोटा आहे. ८४ कोटी रुपये राज्य सहकारी बँकेचा एनपीए २०२३ मध्ये झाला आहे. त्यामुळे आजीमाजी संचालकांना जप्तीच्या नोटिसा निघाल्या आहेत. बँक ऑफ बडोदामध्ये ९ कोटी रुपये दिलेले कर्ज पूर्णतः थकबाकीत गेल्यामुळे बँकेने जप्तीची नोटीस काढलेली आहे. बँक ऑफ इंडिया न्हावरे शाखेची ३० कोटी रुपयांची अनेक वर्षांची थकबाकी आहे. घोडगंगा कारखान्याच्या कामगारांचे पगार व इतर देणी ३५ कोटी रुपयांची आहेत. त्यामुळे कारखान्याचे कर्मचारी संपावर गेले. दरम्यान घोडगंगाच्या कर्मचाऱ्यांवर घेतलेले कर्ज एनपीए झालेले आहे. दरम्यान त्या बिचाऱ्या कामगारांना १०१ नोटिसा आल्या आहेत. वरील सर्व बाबी पाहता बँकांनी ना हरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे व कारखान्याचे भागभांडवल कमी असल्याने एनसीडीसीचा कर्ज प्रस्ताव मान्य केला जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
ज्ञानेश्वर कटके म्हणाले की, शिरूर हवेलीच्या विकासासाठी मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमाणिक प्रयत्न करीन. वेळत व नियोजनबद्ध चासकमान घोडचे आवर्तन सोडण्यासाठी माझे पहिले प्रधान्य असेल, तसेच घोडगंगा सुरू करण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करीन.
रडीचा डाव खेळू नका
चासकमान प्रकल्पाच्या कालव्याच्या अस्तरीकरणासाठी १९९५.९५ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्यामुळे चासकमानचे पाणी सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. चासकमानचे वेळेवर नियमित आवर्तन देण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना कोणीही थारा देऊ नका. घोडगंगाचे अध्यक्ष ऋषिराज पवार अपहरण व मारहाण प्रकरणातील आरोपीने मी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी केले आहे. त्यात कोणाचाही दुरान्वये संबंध नाही. असे पोलिस तपासादरम्यान सांगितले आहे. तसे तपासात सिद्ध झाले आहे. मात्र, निवडणूक काळात भावनिक मुद्दा करून विरोधी उमेदवारांकडून सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात होता. निवडणुका खुल्या वातावरणात खेळीमेळीच्या वातावरणात करायच्या असतात रडीचा डाव खेळू नका, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अशोक पवार यांना यावेळी लगावला.