संभाजी राजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नाही; शरद पवार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 08:23 PM2023-01-03T20:23:32+5:302023-01-03T20:23:42+5:30
राज्यातील महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाणीवपुर्वक विविध वाद उकरुन प्रयत्न केला जात आहे
बारामती : संभाजी राजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नाही,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भुमिका स्पष्ट केली. बारामती येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ही भुमिका मांडली.
शरद पवार म्हणाले, अजित पवारांचं संभाजी महाराजांविषयी विधान मी पाहिलं. पण संभाजी महाराजांविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे प्रमुख आणि सावरकरांनी लिहिलेलं लिखान कोणालाही पसंत पडणारं नाही. पण ते कधीकाळी लिहिलेलं होतं .ते आता उकरून काढून राज्यातील वातावरण खराब करण्यात उपयोग नाही. मात्र संभाजी राजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नसल्याचे पवार म्हणाले.
ज्या नागरिकांना, व्यक्तींना, घटकांना संभाजीराजेंविषयी बोलताना स्वराज्यरक्षक म्हणून त्यांच्या कामगिरीची आठवण करणं चुकीचं नाही. तर काही घटकांना संभाजीराजे धर्मवीर म्हणून पाहात असेल तर त्याविषयी तक्रार करण्याचं कारण नाही. पवार पुढं म्हणाले की, जेव्हा मी ठाण्याला जातो तेव्हा धर्मरक्षक म्हणून काही नेत्यांची नावं येतात. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यामध्ये आनंद दिघे सहकारी होते. त्यांचा धर्मवीर म्हणून उल्लेख करण्यावर माझा आक्षेप नाही. राज्यातील महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाणीवपुर्वक विविध वाद उकरुन प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी पवार यांनी केला.
महाराष्ट्रात भाजपच्या वतीने ४५ लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची घोषणा भाजप नेत्यांनी केली आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यांनी मिशन ४५ ऐवजी मिशन ४८ करायला पाहिजे, असा टोला पवार यांनी लगावला.