यवत/दौंड : नक्कीच एकटा आचारी स्वयंपाक करत नाही, सवंगडी मिळून करतात. मात्र, त्या जेवणात मीठ किती? तिखट किती? आदी टाकणारा मात्र एकच मुख्य आचारी असतो. त्याने योग्य प्रमाणात टाकले की, त्या जेवणाला टेस्ट येते आणि मग वाढपी वाढतो, असे सणसणीत प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे बंधू राजेंद्र पवार यांना दिले आहे.
दौंड येथे बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर, वकील व पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांची परखड शब्दात उत्तरे दिली. पवार म्हणाले, आमदार रोहित पवार यांनी सध्या अजित पवार केवळ बारामती मतदारसंघात सभा घेत फिरतात, अशी टीका केली होती. याबाबत त्यांना विचारले असता कोणी कुठे सभा घ्यावी हा ज्याचा त्याचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मला त्याच्या टीकेला उत्तर द्यावे वाटत नाही. त्याचे त्याला लखलाभ. माझे मला लखलाभ. पत्रकारांनी उगाच आमच्यात तेल ओतण्याचे काम करू नका, अशी टिपणीदेखील त्यांनी यावेळी केली.एका वृत्तवाहिनीने निवडणूक पूर्व केलेल्या सर्व्हेबाबत विचारता, तो सर्व्हे आहे. रिझल्ट काय लागतो बघा, असे सांगितले. विदर्भात आता निवडणुका होत आहेत. त्या सर्व जागा महायुतीला मिळतील असे वातावरण आहे. जसजशा निवडणुका जवळ येतील, तसे चित्र बदललेले दिसेल.