पुणे: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी सांगलीत एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांचा एकेरी उल्लेख केला होता. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून चंद्रकांत पाटलांवर टीकेची झोड उठविण्यात आली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी यावर स्पष्टीकरण देत तो एकेरी उल्लेख अनावधानाने झाल्याचे म्हटले आहे.
पुण्यात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगलीच्या कार्यक्रमात बोलत असताना अनावधानाने शरद पवार यांच्याबद्दल एकेरीउल्लेख आला. शरद पवार आमचे विरोधक जरी असले तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात अनादर कधीच नाही. बांधाला बांध लागून आमचे काही भांडणही नाही. किंबहुना अनेक वेळा त्यांची स्तुती करत असताना मी सांगत असतो की प्रमोद महाजन आम्हाला सांगायचे, मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनी 40 गोष्टी लिहून काढल्या त्यातील 38 गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या. महाराष्ट्राच्या विकासात पवार साहेबांचं योगदानच आहे. आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तीचा अनादर करणे हे आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, हिंदू संस्कृतीने शिकवले नाही.
सांगलीत पक्षाच्या कार्यक्रमात बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण 54 आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिलं नाही. सगळ आयुष्य गेलं कधी 60 वर तो गेला नाही. अशा एकेरी शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.