लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दंडाचा अधिकार दिलेला नाही, पण प्रवेश देण्याचे अथवा प्रवेश करू न देण्याचे अधिकार आहेत. त्याचाच वापर करून रेल्वे प्रशासनाने पुणे विभागातील सर्वच स्थानकांवर प्रवाशांना मास्कशिवाय प्रवेशच न देण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क नसेल तर खरेदी करण्यासाठी स्वतंत्र कक्षही उपलब्ध करून दिला आहे.
पुणे रेल्वे स्थानकात सध्या दिवसा व रात्री मिळून २४ तासांत साधारण १२५ गाड्या येतात जातात. शिवाजीनगर हे आणखी एक रेल्वेस्थानक शहरात आहे. दोन्ही स्थानकांवर प्रवाशांची कायम गर्दी असते.
मास्क व सॅनिटायझर या दोन गोष्टी रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक केल्या आहेत. प्रवाशांची अडचण होऊ नये, यासाठी स्थानकातच मास्क व सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून दिला आहे.
सध्या गाडीत आरक्षणाशिवाय एकही प्रवासी घेतला जात नाही. त्यामुळे जेवढी आसने तेवढेच प्रवासी असेच आहे. रेल्वे प्रशासनानेच मास्कशिवाय प्रवेश नाही, असा धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे डब्यात व स्थानकातही मास्क घातलेलेच प्रवासी असतात. कोणी काढलेला असेल किंवा लावलेला नसेल तर त्याला लगेचच टीसी मास्क लावण्यास सांगतो. प्रवासी शक्यतो नकार देत नाहीत, मात्र दिला किंवा काही कुरबूर झाली तर स्थानकात असलेल्या रेल्वे पोलिसांचे साह्य घेतले जाते.
रेल्वे प्रशासनाला मास्क नाही म्हणून दंड करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे एकाही प्रवाशाला दंड केलेला नाही. त्याऐवजी प्रत्येक प्रवासी चेहऱ्यावर मास्क लावलेलाच असेल याची काळजी घेतली जाते. स्थानकात असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मास्क घालण्याच्या व प्रवाशांनी तो घातला नसेल तर त्यांना तशी सूचना करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
विक्रेत्यांनाही हे सगळे नियम लागू आहेत. त्यांचीही वेळोवेळी तपासणी केली जाते. प्रवाशांना नियमांची माहिती व्हावी यासाठी तसे फलक स्थानकांमध्ये लावण्यात आले आहेत. प्रवाशांकडून मिळणारा अनुभव असा आहे की बहुसंख्य प्रवासी मास्क लावूनच स्थानकामध्ये येतात. त्यामुळे आता फारशी विचारणा करावी लागत नाही. जेवढी आसने तेवढेच प्रवासी असे असल्याने सुरक्षित अंतर आपोआप ठेवले जाते. कोणी गर्दी करून बसलेले असतील तर टीसीकडून त्यांना नियमांविषयी सांगितले जाते.