लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : श्रीपाद कुलकर्णी...वय वर्षे ८५, सुमती कुलकर्णी...वय ८१, दोघांनीही मानसिक खंबीरपणाच्या जोरावर या दोघांनीही कोरोनाच्या संकटाचा नेटाने सामना केला. वेळेवर औषधोपचार, डॉक्टरांना सहकार्य, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम राखण्याची जिद्द यामुळे ते आजारपणातून बाहेर पडू शकले.
श्रीपाद कुलकर्णी साथीच्या अगदी पहिल्या दिवसापासून तब्येतीची व्यवस्थित काळजी घेत होते. पहिल्या लाटेत त्यांना कोरोनापासून लांब राहता आले, दुसऱ्या लाटेत मात्र कोरोनाने त्यांना गाठलेच. लागण नेमकी कोठून झाली, ते कळले नाही. मात्र, दोन दिवस त्यांना बारीक ताप होता, जेवण अजिबात जात नव्हते. लक्षणे दिसत असताना दुखणे अंगावर काढायला नको, या विचाराने तिसऱ्या दिवशी लगेच टेस्ट केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी टेस्ट पॉझिटिव्ह आली. वयाचा विचार करता, पंकज कुलकर्णी यांनी वडिलांना तातडीने देवयानी हॉस्पिटलला ॲडमिट केले. दुसऱ्या दिवशी सुमती कुलकर्णी यांनाही ॲडमिट करण्यात आले.
दोन दिवसांनी श्रीपाद कुलकर्णी यांचा संसर्ग वाढला. ऑक्सिजनची पातळीही कमी झाली, त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. रेमडेसिविरचे डोसही सुरू करण्यात आले. रेक्टल ब्लिडिंग झाल्याने तब्येत गंभीर झाली. पुढील दोन दिवस खूप टेन्शनमध्ये गेले. मात्र, डॉ. वैशाली पाठक आणि हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमने प्रयत्नांची शर्थ केली. तीन दिवसांनी त्यांची तब्येत पूर्ववत होऊ लागली आणि सर्वांचाच जीव भांड्यात पडला. श्रीपाद कुलकर्णी यांनी अगदी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यापासून अजिबात निगेटिव्ह विचार करायचा नाही, असे ठरवले होते. डॉक्टरांनीही त्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. सुमती कुलकर्णी यांची तब्येत मात्र व्यवस्थित होती. या काळात सोसायटीतील लोक, मित्र, नातेवाईक फोनवरून सातत्याने संपर्कात होते, सगळे काही नीट होईल, असा धीर देत होते. पंकज यांचा चुलत भाऊ आणि बहीण डॉक्टर असल्याने तेही सातत्याने त्यांची चौकधी करत होते.
साधारण १७ दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. घरी आल्यावरही त्यांना १५ दिवस खूप अशक्तपणा होता. उठून बसल्यावरही खूप दम लागायचा. मात्र, औषधे वेळेवर घेणे, वाफ घेणे, जमेल तसा हलका व्यायाम करणे हे वेळापत्रक त्यांनी व्यवस्थित पाळले. त्यांचा भाचा आयुर्वेदिक डॉक्टर असल्याने त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी औषधेही सुरू ठेवली. हळूहळू दोघांचीही तब्येत पूर्वपदावर आली. मन प्रसन्न ठेवण्याचा त्यांनी कायम प्रयत्न केला.
(फोटो -पॉझिटिव्ह स्टोरी नावाने आहे)