पुणे : राजकीय संस्कृतीच्या परिवर्तनासाठी हातामध्ये झाडू घेऊन महाराष्ट्रामध्ये उतरलेल्या आम आदमी पक्षाने राज्यात यंदाची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्यातही ‘आप’ला उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा सत्तापक्षाला होऊ नये असे कारण दिले जात असले तरी कमकुवत पक्ष संघटना, पक्ष बांधणीकडे झालेले दुर्लक्ष आणि निधीची कमतरता अशी अनेक कारणे निवडणूक न लढण्यामागे आहेत. आम आदमी पक्षाचा पुण्यामधील लोकसभेचा उमेदवार जाहिर करण्यात येणार असल्याचे शहर पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. पुण्यामधून उमेदवारीसाठी पाच नावे केंद्रिय समितीकडे पाठविण्यात आली होती. अॅड. असिम सरोदे, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार, कर्नल सुरेश पाटील, श्रीकांत आचार्य आणि शहराध्यक्ष मुकुंद किर्दत यांच्या नावांची शिफारस करण्यात आली होती. मात्र, पक्षाच्या दिल्लीतील ‘पॉलिटीकल अफेअर्स कमिटी’ने महाराष्ट्रामधील पक्षाची सद्यस्थिती पाहता लोकसभा निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आम आमदी पक्षाने पुण्यातील लोकसभा निवडणूक लढवावी अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांची अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी काही नावे शोधली होती. परंतू, केंद्रिय समितीच्या निर्णयामुळे स्थानिक कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. सध्या राज्यामध्ये आणि पुण्यामध्येही पक्षाची स्थिती फारशी चांगली नाही. वास्तविक आप राज्यामध्ये दाखल झाल्यापासूनच अपेक्षेप्रमाण पक्ष वाढू शकला नाही. निवडणूक न लढण्यामागे निधीचा अभाव, आर्थिक बाजू कमकूवत असणे, सक्षम उमेदवारांची वानवा अशी अनेक कारणे आहेत. कार्यकर्त्यांची फळी उभी करण्यात स्थानिक पदाधिकारी कमी पडले ही वस्तुस्थिती आहे. तुर्तास पुण्यात आणि राज्यातही आप निवडणुका लढणार नाही.
पुण्यात ‘आप’ला उमेदवार नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 7:51 PM
आम आदमी पक्षाचा पुण्यामधील लोकसभेचा उमेदवार जाहिर करण्यात येणार असल्याचे शहर पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.
ठळक मुद्देसध्या राज्य आणि पुण्यामध्येही आम आदमी पक्षा पक्षाची स्थिती फारशी नाही चांगली