पुणे: संपूर्ण देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. एक मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना सरसकट लसीकरण चालू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोफत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले होते. पण सध्यातरी असा कुठलाही निर्णय झाला नाही. महाविकासआघाडी एकत्र बैठकीत मोफत लसीकरणाबाबत निर्णय घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले आहे. कात्रज येथे कोव्हिडं सेंटरच्या उदघाटनासाठी ते आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लसी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणे गरजेचे आहे. सर्वांना लस मिळण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. अडचणी न येता सर्वांना लस सहज मिळण्यासाठी सरकारचे प्रयत्न राहतील. असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.
कोरोनाच्या चिंताजनक परिस्थितीत राज्य सरकार नियोजन करत आहे. राज्याला जगभरातून कोरोनासाठी लागणाऱ्या आरोग्यविषयक वस्तू खरेदी करण्याचे अधिकार आहेत. ऑक्सिजन पुरवठा अगदी काठावर आहे. त्यातून रेमदडेसीविरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवू लागला आहे. ते इतर राज्यांकडून मिळवण्याचे प्रयत्नही चालू असल्याचे ते म्हणाले आहेत.
लॉकडाऊन वाढवणार का?
राज्यातील सर्व जिल्ह्यांचा स्थानिक आढावा घेतला जाणार आहे. त्यामध्ये ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटिलेटरची परिस्थिती पाहून लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल. असेही त्यांनी सांगितले आहे.
पंढरपूर निवडणूक आयोग चुकले आहे
निवडणूक आयोगाने मुदतवाढ द्यायला हवी होती. नागरिक एकत्र आल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असते. आयोगाने निवडणुका लावल्या नसत्या तर हा प्रकार टाळता आला असता.
अजित पवारांवर राज्याची पूर्ण जबाबदारी
चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे आहेत. त्यांना पुण्यात काहीतरी करून दाखवायचे आहे. म्हणून ते काही बोलत आहेत. अजित पवार कोव्हिडं स्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्यातही कोणताही प्रश्न उपस्थित झाला तरी ते उपलब्ध होतात. त्यांच्यावर पूर्ण राज्याची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.