लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रिक्षाचालकांना आता पासिंग चाचणीसाठी दिवेघाट चढावा लागणार नाही. कारण, येत्या दोन ते तीन महिन्यांत आळंदी रोड येथील आरटीओ कार्यालयातच रिक्षा पासिंग व अन्य कामे होणार आहे. यामुळे रिक्षाचालकांची सोय होणार आहे. रिक्षा पंचायतने सातत्याने हा विषय मांडला होता.
आळंदी रोड येथील कार्यालयात ब्रेक टेस्ट ट्रॅक व रोलर ब्रेक टेस्टरचे काम सुरू आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे काम झाल्यावर रिक्षासह अन्य वाहनांचे पासिंग देखील याच कार्यालयात करण्याचे नियोजन आरटीओ प्रशासन करीत आहे. या निर्णायामुळे रिक्षाचालकांना दिलासा मिळेल. त्यांना शहरापासून दूर दिवे घाट चढून दिवे गावात पोहोचून टेस्ट द्यावी लागणार नाही. त्याच्या वेळेत बचत होईल. तसेच आरटीओ कार्यालयावरील देखील ताण कमी होणार आहे. एका दिवसात पूर्वीच्या तुलनेने जास्त रिक्षाचे पासिंग होईल. त्यामुळे पासिंगसाठी असलेली वेटिंग कमी होईल.
छत्री आंदोलन :
मुक्त परवाना धोरणामुळे रिक्षांची वाढणारी संख्या, फायनान्स कंपन्यांनी रिक्षाचालकांवर चालवलेली सावकारी दडपशाही, गाडी पासिंगसाठी चढावा लागणारा दिवे घाट, टाळेबंदी काळात घेतलेल्या विमा हप्त्याचा वर्षानंतरही न मिळालेला परतावा, पासिंगसाठी रिफ्लेक्टर लावण्यासारखे नवे नियम लावून रिक्षाचालकांची गळचेपी केली जात आहे. आदी प्रश्नांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी रिक्षा पंचायतीच्या वतीने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालया समोर छत्री निदर्शने करण्यात आली. पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने झाली.
यावेळी आंनद बेलमकर, सिद्धार्थ चव्हाण, बाळासाहेब पोकळे, रवींद्र पोरेडी, रावसाहेब कदम ,अण्णा कोंडेकर, भरत उतेकर, विशाल बागुल,अजित पेंटर,जितेंद्र फापाळे यांसह ॲड. मोनाली अपर्णा, मंगल निकम आदी उपस्थित होत्या.
-------------------------------------