खोडद : शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी व त्यातून उत्पन्न वाढण्यासाठी शेतकऱ्यांनी पशुपालनावर भर द्यायला हवा.शेतकऱ्यांना आर्थिक उंचीवर नेणारा एकमेव खात्रीशीर व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय आहे.दूध क्रांती मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय शेतकऱ्यांमध्ये अर्थक्रांती होणार नाही, असे प्रतिपादन पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले.
हिवरे तर्फे नारायणगाव येथील माजी सैनिक बाळासाहेब मुळे यांच्या मातोश्री सानेन गोट फार्मला सुनील केदार यांनी भेट दिली. यावेळी आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, कृषिरत्न अनिल मेहेर, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ.धनंजय परकाळे,सहआयुक्त डॉ.संतोष पंचपोर आदी उपस्थित होते.
सुनील केदार म्हणाले की, नवीन प्रजननासाठी सानेनियन नर आणि मादी यांची आयात करून हा व्यवसाय अधिक व्यापक करण्यासाठी परायत्न करू. लवकरच सानेन शेळी व बोकड तसेच परदेशातील गोर गाय, सहेवाल गाय यांच्या दुधाचे वाढते प्रमाण पाहून त्या प्रजातीसुद्धा भारतामध्ये उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातील. सानेन शेळी बंदिस्त शेळीपालनासाठी उत्तम असल्याने अधिक दूध उत्पादन देणारी,दिसायला पांढरी शुभ्र असल्याने आकर्षक दिसते. सानेन शेळीच्या दुधाचा औषधनिर्मितीसाठी उपयोग होतो. शेळीच्या दुधापासून बनवलेल्या चीज,पनीर व इतर पदार्थांना परदेशात फारच मागणी असून महाग व आवश्यक मानले जाते.
शेळ्यांची पैदास,खाद्य,उत्पन्न, व्यवस्थापन व अडचणी याबाबत माहिती घेतली.
शेतकऱ्यांना परदेशातून सानेन प्रजातीच्या शेळ्या व बोकड उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने परवानगी देऊन शेळ्या व बोकड कृषी विज्ञान केंद्र व शेळी सुधार केंद्र यांच्यामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहच व्हावी यासाठी मंत्री सुनील केदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
२२ खोडद
सुनील केदार यांनी हिवरे तर्फे नारायणगाव येथील बाळासाहेब मुळे यांच्या सानेन गोट फार्मला भेट दिली.