- दीपक कुलकर्णी- लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आपल्या अवतीभवतीचे लोकच काश्मीरबाबत खूप नकारात्मक आहेत. खरंतर काश्मीर मध्ये काम करण्यासारखा दुसरा आनंद नाही. त्या प्रांतातली संस्कृती ,निसर्ग सौंदर्य, माणसे, वातावरण असे सगळे काही तुम्हाला आपलेसे करतात. तिथल्या माणसांना सुध्दा आपण हवे आहोत. परंतु, काश्मीरमधल्या दुर्गम भागातील वैद्यकीय सुविधांची कमतरता, दुरवस्था चिंताजनक आहे...हे निरीक्षणे आहेत पुण्यातील तरुणीची....‘तिने’ स्वत:च्या वैद्यकीय शिक्षणाला व्यवसायाच्या कक्षेत उभे न करता माणुसकीचा सेतू भरभक्कम करण्याकरिता हे शिक्षण उपयोगात आणण्याचा निश्चय केला आहे. डॉ.मानसी पवार हे तिचे नाव. औंध येथील रुग्णालयात मानसी फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग काश्मीरी नागरिकांना व्हावा, या हेतूने ती महिन्यातून एकदा श्रीनगरमधला बाह्य रुग्ण विभाग चालवते.मानसी म्हणाली, ‘‘माझ्या मनात काश्मीरविषयी प्रचंड कुतुहल होते. त्यातूनच काश्मीरमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांशी माझा जवळून संबंध आला. प्रत्यक्ष तिथे जाऊन काम करण्याची इच्छा निर्माण झाली. ‘श्रीनगरला जाते,’ असे घरी जेव्हा सांगितले, तेव्हा ते खूप चिंतेत पडले होते. माझ्याही मनात थोडी धाकधूक होतीच. पण तिथे गेल्यावर स्थानिक व्यक्तींशी झालेल्या संवादातून काश्मिरी लोकांच्या मनात देखील परप्रांतीयांबद्दल आत्मीयता असल्याचे जाणवले. आपल्या मनात काश्मीरींविषयी जी भीती निर्माण केली गेली ती निरर्थक असल्याचेही समजले. माझा तिथे काम करण्याचा अनुभव खूपच समाधानकारक, आनंददायी आहे. तसेच तेथील स्थानिक आणि इतर राज्यांमधील नागरिकांमध्ये परकेपणा, विसंवाद आणि गैरसमजांची दरी असल्याचं वास्तव नाकारता येत नाही.’’ आजूबाजूचे लोक जेव्हा म्हणतात, तू जे काम करते आहे ते अगदी छान आहे. पण तो भाग सुरक्षित नाही. तिथे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. तेथील परिस्थिती केव्हाही चिघळू शकते. जीवाला कधीही धोका निर्माण होऊ शकतो. या सगळ््या शंका अगदी कालपर्यंतच्या. यामुळे कुठेतरी मनात नकारात्मकता डोकावते. पण तेथील दुरवस्था, वैद्यकीय सेवांबद्दलचे अज्ञान माझ्या समोर उभे ठाकते आणि मनातील भीती दूर होते. तिथे पायाभूत वैद्यकीय सुविधा आहेत, पण पुण्या-मुंबई सारख्या आधुनिक सुविधांची उणीव आहे. त्या आधुनिक उपचारांसाठी त़्यांना श्रीनगरमध्ये यावे लागते. म्हणून विनामोबदला सेवा करून तेथील रुग्णांना बरे करण्याचा माझा मानस आहे. चौकट ‘‘फिजिओथेरपिस्ट म्हणजे काय हे देखील तेथील लोकांना माहिती नाही. यातच माझ्या तिथे जाण्यासंबंधीच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. तेथील डॉक्टरांशी बोलून मी फिजिओथेरपीतून स्थानिक रुग्णांवर उपाय करण्याचा निर्णय घेतला. श्रीनगर येथील एका क्लिनिकमध्ये मी महिन्यातले काही दिवस फिजिओथेरपी विभाग चालवणार आहे. दुर्गम भागातील रुग्णांना पायाभूत व आधुनिक वैद्यकीय सेवा पुरविण्याचा माझा माझा मानस आहे. प्राथमिक स्तरावर हे काम विनाशुल्क आहे.’’ - डॉ. मानसी पवार, फिजिओथेरपिस्ट...................
काश्मीर मध्ये भीती नाही.. पण आजबाजूचीच माणसं मनात भय पेरतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 6:00 AM
‘श्रीनगरला जाते,’ असे घरी जेव्हा सांगितले, तेव्हा ते खूप चिंतेत पडले होते.
ठळक मुद्देडॉक्टरांशी बोलून फिजिओथेरपीतून स्थानिक रुग्णांवर उपाय करण्याचा निर्णय