पुणे : विविध कारणांमुळे सातत्याने पेटणाऱ्या बसच्या पार्श्वभूमीवर फायर सेफ्टी आॅडिट करण्याचा पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपी) निर्णय बारगळला आहे. सध्या वाहनांचे फायर आॅडिट करणारी नोंदणीकृत संस्थाच नाही. तसेच पीएमपीने एका संस्थेला दिलेले कामही अपेक्षेपेक्षा खूप महागडे असल्याने ते थांबविण्यात आले आहे. त्यामुळे बसचे फायर आॅडिट होणार नसल्याचे चिन्ह आहे.मागील काही वर्षांत पीएमपीच्या मार्गावर धावणाºया काही बसला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडल्या आहेत. या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने ताफ्यातील सर्व बसचे फायर आॅडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार निविदाप्रक्रियेद्वारे एका संस्थेला कामही देण्यात आले. या संस्थेने काही बसचे आॅडिट करून तसा अहवाल पीएमपीला दिला. मात्र, या आॅडिटसाठीचा खर्च पीएमपीला परवडणारा नसल्याने हे काम थांबविण्यात आले आहे. प्रत्यक्षात, सध्या केवळ वाहनांचे फायर आॅडिट करणाºया संस्था नाहीत. इमारतींच्या आॅडिटप्रमाणे वाहनांचे आॅडिट केले जात नाही. त्यामुळे पीएमपीला एकाच संस्थेकडूनच प्रतिसाद मिळाला. पीएमपीने घेतलेला आॅडिटचा निर्णय चांगला असला तरी असे आॅडिट करणारी नोंदणीकृत संस्थाच नाही. त्यामुळे बसचे आॅडिट होऊ शकणार नाही, असे पीएमपीतील अधिकाºयांनी सांगितले.बसला लागणाºया आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘पीएमपी’ने एका खासगी संस्थेकडून प्रत्येक बसमध्ये एक उपकरण बसविण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार काही बसमध्ये हे उपकरणही बसविण्यात आले. मात्र, ज्या बसमध्ये हे उपकरण बसविण्यात आले होते, ती बस पेटल्यानंतरही या उपकरणाचा उपयोग झाला नाही. ही बस त्या उपकरणासह खाक झाल्याचे निदर्शनास आले आहे. आग लागल्यानंतर हे उपकरण सुरू होऊन आग आटोक्यात आणणाºया रसायनांची फवारणी करते. पण त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे संबंधित संस्थेचे कामही थांबविण्यात आले. या उपकरणाचा खर्चही अधिक असून हा खर्च देण्यावरून पीएमपी व संबंधित संस्थेमध्ये वाद सुरू असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.>अग्निशमन उपकरण : दहा महिन्यांत नऊ बस पेटल्यामागील दहा महिन्यांत पीएमपीच्या नऊ बस मार्गावरच पेटल्या आहेत. या आगीची कारणे शोधण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने सर्व बसचे फायर सेफ्टी आॅडिट करण्याचे सुचविले आहे. त्यानुसार पीएमपी प्रशासनाने आॅडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रशासनाने सुरुवातीला अग्निशमन दलाकडे आॅडिट करून देण्याची मागणी केली. मात्र, ते शक्य होत नसल्याने फायर आॅडिट करणाºया काही खासगी संस्थांची यादी पीएमपी प्रशासनाला देण्यात आली होती. पण यापैकी एकही संस्था वाहनांचे आॅडिट करणारी नाही.आगीच्या घटनांनंतर पीएमपी प्रशासनाने बसमध्ये अग्निशमन उपकरणे बसविण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार अनेक बसमध्ये हे उपकरण बसविण्यात आल्याचा दावा पीएमपीच्या अधिकाºयांनी केला. तसेच ज्या बसमध्ये हे उपकरण नाही, त्या बसमध्येही उपकरण बसविले जात आहे. आरटीओकडून बसच्या पासिंगवेळी हे उपकरण पाहिले जाते. त्याशिवाय बस मार्गावर सोडण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळे काही वेळा केवळ तपासणीपुरतेच हे उपकरण संबंधित बसमध्ये बसविले जात असल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत.
पीएमपीचे फायर आॅडिट नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:10 AM