दीपक जाधव, पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सहकारनगर- पद्मावती या प्रभाग ३५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभागृहनेते सुभाष जगताप व त्यांच्या नातेवाईक मेघा भिसे यांना अनपेक्षितपणे पराभवाचा धक्का बसला आहे. त्याच प्रभागातून मतदारांनी आघाडीच्या इतर दोन उमेदवारांना निवडून दिले असताना जगताप व भिसे यांच्याबाबत मात्र क्रॉस व्होटिंग होऊन त्यांचा पराभव झाला आहे. आघाडी करून मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न प्रभाग ३५ मध्ये फसला असून जगताप यांना आघाडीचा फायदा झाला नसल्याचे निकालावरून स्पष्ट दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी यंदा पहिल्यांदाच काही जागांवर आघाडी करून निवडणूक लढविली. सहकार नगर-पद्मावती या प्रभागात आघाडी झाल्याने येथून आघाडीचे सर्व उमेदवार विक्रमी मतांनी निवडून येणार असा अंदाज वर्तविला जात होता. गेली २५ वर्षे महापालिकेचे सभागृह गाजविणारे सुभाष जगताप, राष्ट्रवादीच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष अश्विनी कदम, काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागूल असे दिग्गजांचे पॅनेल या प्रभागात तयार झाले होते. या तिन्ही उमेदवारांनी एकत्र प्रचारही केला होता; मात्र मतदानामध्ये इथे मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाल्याचे दिसून येत आहे.आबा बागूल ५ हजार तर अश्विनी कदम २१०० मतांनी विजयी झाल्या त्याचवेळी सुभाष जगताप यांचा २ हजार ९५० मतांनी तर मेघा भिसे यांचा ८ हजार ६८४ मतांनी पराभव झाला. जगताप यांची लढत भाजपाचे महेश वाबळे व शिवसेनेकडून शिवलाल भोसले यांच्याविरुद्ध झाली. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असलेले व तिकीट नाकारले गेल्याने शिवसेनेच्या तिकिटावर उभे राहिलेले नगरसेवक शिवलाल भोसले यांना १० हजार १९९ मते मिळाली. भोसले यांच्या बंडखोरीचाही जगताप यांना मोठा फटका बसला. त्यामुळे भाजपाचे महेश बावळे यांचा २ हजार मतांनी विजय झाला. (प्रतिनिधी)
आघाडीनंतरही फायदा नाहीच
By admin | Published: February 25, 2017 2:45 AM