पुणे : ‘गुरूजी आपके साथ सवाई गंधर्व महोत्सव मैं कौन कौन आ रहा है? तिने विचारले. ‘क्यूं, तुम आना चाहती हो? ती म्हणाली, ‘हा’. गुरूजी म्हटले, तो ‘चलो’....त्यानंतर तिने स्वरमंचावर नुसती गुरूजींना सहवादनाची साथच दिली नाही तर ‘दर्दी’ रसिकांची वाहवा देखील मिळविली. आपल्या शिष्याला मिळालेली दाद बघून गुरूजींचा उर अभिमानाने भरून आला.
६७ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या मैफलीत त्यांना सहवादनाची साथ देणाऱ्या कृतिका जंगीनमठ या दिव्यांग मुलीने तिच्या अप्रतिम सुरावटींमधून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. चौरसिया यांनी आपल्या या लाडक्या शिष्येला वादनाची संधी देऊन तिच्यात आत्मविश्वास निर्माण केला. रसिकांच्या कौतुकाने ती देखील सुखावून गेली. कृतिकाचा बासरीवादनाचा प्रवास हा काहीसा रंजक असाच आहे. कृतिकाची आई पदमावती विरेश जंगीनमठ यांनी ‘लोकमत’शी बोलताना तिचा प्रवास शब्दबद्ध केला. त्या म्हणाल्या, कृतिकाला सुरूवातीला दिव्यांग मुलींच्या शाळेत प्रवेश घेतला. तिला ‘संगीत’ विषय होता. संवादिनीवर शिक्षिका तिला संगीत शिकवायच्या. त्या संवादिनीचे नोटेशन ऐकून ती त्याच भाषेत बोलायची. ती वयाच्या तिसऱ्या वर्षी संवादिनी आणि गाणं दोन्ही शिकली. तिची आजी द्वारकेला प्रवासाला गेली असताना तिने कृतिकासाठी बासरी आणली. गाणी ऐकून ती बासरीवर वाजवायची. शास्त्रोक्त शिक्षण देण्यासाठी विजापूरमधील बासरीवादकांकडे घेऊन गेलो. तिने बासरीचे सूर लवकर आत्मसात केले. तेव्हा ते म्हणाले हिला मुंबईला पं. चौरसिया यांच्याकडे घेऊन जा. आम्ही तिला चौरसिया यांच्या गरूकुलमध्ये घेऊन गेलो. तिला शिकवायला प्रोब्लेम नाही. पण ती दिव्यांग असल्यामुळे तिला आम्हाला गुरूकुल मध्ये ठेवून घेता येणार नाही. मग आम्ही विजापूरला परत आलो. बाजारात पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या सर्व सीडीज आम्ही विकत घेतल्या. ती ऐकून ती एकलव्याप्रमाणे शिकली. ठाण्याच्या निलेश पोटे यांच्याकडून आम्ही तिच्यासाठी बासरी तयार करून घेतली. पुण्याच्या चिन्मयनाथ बिंदू यांच्या तीन आठवड्याच्या कार्यशाळेत तिने अभ्यासपूर्ण पद्धतीने ती बासरी वाजवायला शिकली. तीन स्केलची बासरी ती पकडू लागली. तेव्हा ती आठवीमध्ये शिकत होती. आम्ही पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडे पुन्हा गेलो. तेव्हा मुंबईमध्ये फ्लँट घेऊन राहिलो. हळूहळू ती गुरूजींची लाडकी शिष्य झाली. गुरूजींबरोबर सोलापूरसह इतर ठिकाणी तिने गुरूजींबरोबर वादन केले आहे. मुंबईची ‘विरासत’ स्पर्धाही ती जिंकली आहे. गुरूजींना ती वादन दूरध्वनीवरून ऐकवते आणि गुरूजी देखील तिचे तासतास ऐकतात. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात रसिकांनी तिच्या वादनाला दिलेल्या कौतुकाच्या थापेने आम्ही भरून पावलो. ......’ सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या स्वरमंचावर गुरूंजीबरोबर वादन करणं आणि रसिकांची दाद मिळणं हा खूपच आनंदादायी आणि समृद्ध करणारा अनुभव होता.मी मूळची कर्नाटकमधील विजयपूर (विजापूर) गावची. मी शाळा आणि महाविद्यालयीन सुट्टीच्या काळात मुंबईला गुरूजींकडे जाऊन गुरूकुल पद्धतीने बासरीवादनाचे शिक्षण घेते. ’पंडितजींसारखा गुरू नाही’’- कृतिका जंगीनमठ, दिव्यांग बासरीवादक