लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात ७४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. असे असले तरी ज्या गावांमध्ये निवडणुका नाही अशा गावांमध्ये विकास कामांना आचारसंहितेची कोणतीही अडचण नसल्याचे राज्य निवडणूक आचार संहिता विषयक काढलेल्या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा जास्त ७४८ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. निवडणुक नियमानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू केली असली तरी ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत नाहीत, त्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही विकास कामाला आचारसंहितेचा अडसर नसल्याचे या देशांमध्ये नमूद केले आहे. या ग्रामपंचायती त्यांची नियमित विकास कामे सुरू ठेवू शकतील फक्त त्या विकासकामांचा परिणाम शेजारी निवडणूक होणार या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर होणार नाही याची दक्षता ग्रामपंचायतीने घ्यावी लागणार आहे.
निवडणूक न होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रामध्ये विकास कामांवर परिणाम होणार नसला तरी ह्या ग्रामपंचायत क्षेत्रातील विकास कामाचे कार्यारंभ आदेश देणे टेंडर प्रक्रिया राबवणे तसेच तांत्रिक मान्यता देणे प्रशासकीय मान्यता देणे याबद्दल मात्र राज्य निवडणूक आयोगाने कोणतीही स्पष्टता आदेशामध्ये दिलेली नसल्यामुळे या ग्रामपंचायतींचा गोंधळ उडाला आहे.