पुणे : व्यावसायिक इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणेची दर ६ महिन्यांची तपासणी करून ती सुस्थितीत आहे की नाही, याची पाहणी करणे बंधनकारक असतानाही शहरातील व्यावसायिक इमारतींची अशी तपासणीच अग्निशामक दलाकडून होत नाही. त्यामुळे अनेक इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा बंद स्थितीमध्ये आहे.सोहराब हॉल येथील पहिल्या मजल्यावरील क्रॉसवर्ल्ड या पुस्तक विक्रीच्या दुकानाला रविवारी आग लागून मोठे नुकसान झाले. अग्निशामक दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा या इमारतीमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा बंद असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना मोठी शर्थ करावी लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल ९ तास लागले. या पार्श्वभूमीवर, व्यावसायिक इमारतींच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अग्निप्रतिबंधक यंत्रणा सुस्थितीत नसल्याने नुकत्याच मुंबई महापालिकेने ११ मॉल व ३०८ इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, पुणे महापालिकेनेही व्यावसायिक इमारतींची पाहणी करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे मत अग्निशामक दलातील जवानांनी व्यक्त केले. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा इमारतींची नियमित तपासणी झाल्यास आगीच्या दुर्घटना टाळता येऊ शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
व्यावसायिक इमारतींची तपासणीच नाही
By admin | Published: September 30, 2015 1:42 AM