- राजानंद मोरे
पुणे : केंद्र सरकारने मानसिक आरोग्य संगोपन कायद्याची अंमलबजावणी सुरू केली असली तरी राज्यात कायद्यातील तरतुदींनुसार प्रशिक्षित मनुष्यबळच उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. कायद्यामध्ये क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिक सोशल वर्कर या पदांसाठी त्या विषयामध्ये मास्टर आॅफ फिलॉसॉफी (एम.फिल.) ही शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे. मात्र, सद्यस्थितीत कोणत्याही विद्यापीठात या विषयांमधून ‘एम.फिल’चा अभ्यासक्रमच नाही. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी कशी होणार, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
देशात दि. २९ मे २०१८ पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींचे हक्क, त्यांना आवश्यक सोयी-सुविधा, देखभाल, उपचार, समुपदेशन, संबंधित संस्थांची स्थापन, त्यावरील नियंत्रण यांसह विविध बाबींचा कायद्यामध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे. मानसिक आजार असलेल्या व्यक्ती तसेच त्यांचे नातेवाइकांचे समुपदेशन, पुनर्वसन, आजाराचे निदान करण्यासाठी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट व सायकॅट्रिक सोशल वर्करची गरज असते. आतापर्यंत या पदांसाठी मानसशास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि पदविका प्राप्त करणे आवश्यक होते. खासगी आस्थापनांमध्ये समुपदेशक म्हणून केवळ केवळ पदव्युत्तर पदवीही ग्राह्य धरली जाते. पण नवीन कायद्यानुसार एम.फिल. ही पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. मात्र, राज्यात कोणत्याही विद्यापीठात ही पदवी उपलब्ध नाही. महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. नितीन अभिवंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थेमध्ये या विषयातील पदविका अभ्यासक्रम आहेत. कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाल्यास क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिक सोशल वर्कर उपलब्धच होणार नाहीत. हा अभ्यासक्रमच उपलब्ध नसल्याने एकही पात्रताधारक व्यक्ती मिळणार नाही. सध्या मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतलेले अनेक जण समुपदेशक म्हणून काम करतात. या अभ्यासक्रमात खोलवर ज्ञान मिळत नाही. एम.फिल. अभ्यासक्रम सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना संशोधन, टेस्टिंग, समुपदेशन याबाबत योग्यप्रकारे ज्ञान मिळू शकते. या क्षेत्रामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आहे. एम.फिल. अभ्यासक्रम सुरू झाल्यास ही कमतरता हळूहळू दुर होऊ शकेल.क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट...
- मानसिक आजार असलेल्या रुग्णांच्या मानसिक समस्या जाणून घेणे, बुद्ध्यंक तपासणे, आजाराचे निदान करणे, विविध पद्धतीने तपासण्या करणे, मानसशास्त्रीय उपचार करणे, त्यानुसार समुपदेशन करण्याचे काम क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट करतात.
- मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांना महत्त्वाचे स्थान असते. तर सायकॅट्रिक सोशल वर्कर म्हणजे मानसिक समाजसेवक. मानसिक आजार असलेल्या रुग्ण, नातेवाइकांच्या सामाजिक स्थितीचा अभ्यास करणे, त्यांचे पुनर्वसन, समुपदेशन यासाठी त्यांची गरज भासते.
- पुण्यात ससून रुग्णालयाच्या आवारातील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट या विषयाचा एमफिल अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने मंजुरीही दिली आहे. पण त्याची प्रवेश क्षमता केवळ आठ एवढीच असेल. त्यामुळे इतर संस्थांमध्येही हा अभ्यासक्रम सुरू होणे आवश्यक असल्याचे डॉ. नितीन अभिवंत यांनी सांगितले.