लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. याबाबत तुम्हाला काय वाटते ?’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘‘शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहेत. काही लोक असे काही तरी बोलत राहतात, त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही,’’ असे सांगत अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव घेणे टाळून दुर्लक्ष केले.
हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचे राजकारण सुरू झाले आहे का? असा सवाल राज ठाकरे यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता. यावर अधिक भाष्य करणे अजित पवार यांनी टाळले.
----------
आरक्षणाचा मुद्दा केंद्राच्या हातात
महाराष्ट्रात असा ओबीसी व मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, तसाच प्रश्न गुजरात, राजस्थान व अन्य राज्यांमध्ये देखील निर्माण झाला आहे. राज्यातील आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात गेला आहे. शासन म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोतच, पण सध्या आरक्षणाचा मुद्दा केंद्राच्या हातात आहे. त्यांनी मनावर घेतले तरच मार्ग निघेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले.