राज ठाकरेंच्या बोलण्याला महत्व देण्याची गरज नाही; अजित पवारांचे सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 02:26 PM2021-08-20T14:26:20+5:302021-08-20T14:26:29+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं होतं. राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला होता. आजच्या कोरोना आढावा बैठकीनंतर पुण्यात माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
अजित पवार म्हणाले, शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोकं असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं काम नाही, असं म्हणत अजितदादांनी राज ठाकरेंचं नाव घेणं देखील टाळलं आहे.''
''हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा असा आरोप राज ठाकरेंनी केला होता.''
राज्यात आधीपासूनच जाती होत्या. पण जाती अभिमान बाळगण्यापुरत्याच होत्या. पण गेल्या 20 वर्षापासून चित्रं बदललं. लोक जातीचा अभिमान बाळगण्याबरोबरच इतर जातींचा तिरस्कार करू लागले आहेत. हे सर्व राजकीय स्वार्थातून होत आहे. जातीचा मुद्दा हा तर नेत्यांची आयडेंटीटी होत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाला, असंही ते म्हणाले होते.''
शरद पवार काय म्हणाले होते?
राज ठाकरे यांच्या आरोपाला उत्तर देताना, “त्यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे”, असा सल्ला शरद पवारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना दिला होता.