पुणे : कोविड काळात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामगिरीचं कौतुक परदेशात झाले. केंद्र सरकारनेही महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी करत असलेल्या कामाचं कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. असं असताना मुख्यमंत्री बदलण्याची जी काही मागणी होत आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागील अनेक दिवसांपासून सक्रिय नसल्यामुळे कार्यवाह मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या कुणाला तरी जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी सातत्याने भाजपकडून करण्यात येते. त्यावर उत्तर देताना त्या बोलत होत्या. पुण्यातील वारजे परिसरात एका कार्यक्रमासाठी आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, विरोधकांना बोलण्याचा अधिकार आहे त्यांनी बोलत राहावं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचं काम करत राहतील. महाराष्ट्र सरकारने कोरोना काळात केलेल्या कामगिरीचं कौतूक परदेशात झालं आणि केंद्र सरकारनेही केलं आहे. त्यामुळे विरोधकांच्या या मागणीला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही. राज्यासमोर दुसरी अनेक महत्त्वाची कामं असून महाविकासआघाडीचे सर्व मंत्री या कामात व्यस्त आहेत.
उत्तर प्रदेशची जनता पुन्हा एकदा अखिलेश यादव यांना संधी देईल
उत्तर प्रदेशात ज्याप्रकारे लोकं भाजपमधून बाहेर पडत आहेत ते पाहता उत्तर प्रदेशात नवीन आणि चांगला बदल दिसून येतोय. गेल्या पाच वर्षात उत्तर प्रदेशात मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, मोठी पॉलिसी मेकिंग असं काही झालेलं दिसत नाही. घोषणा खूप झाल्या असतील परंतु प्रत्यक्षात मात्र यातले काही झालेलं दिसत नाही .अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांना मिळणारा प्रतिसाद पाहता उत्तर प्रदेश बदलाच्या दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे. आम्ही सगळे अखिलेश यादव आणि जैन चौधरी यांच्याकडे खूप अपेक्षेने पाहात आहोत. अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना त्यांचा कार्यकाळ उत्तम राहिला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशची जनता पुन्हा एकदा या दोघांना सेवा करण्याची संधी देईल.