पुणे : ‘प्रसारमाध्यमांची साधने, तंत्रज्ञान बदलेल; पण वाचन व ज्ञानार्जनाचा पर्याय बदलणार नाही. कोणत्याही काळात माणसांच्या भावभावनांशी, स्पंदनांशी नाते जोडल्याशिवाय पत्रकारिता यशस्वी होणार नाही. पत्रकारितेत शब्दसंग्रह व ज्ञानाला दुसरा पर्याय नाही,’ अशा शब्दांत ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी पत्रकारितेतील यशाचे गमक विद्यार्थ्यांसमोर उलगडले.मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयाच्या वृत्तविद्या विभागाच्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ आणि वाचक मंडळाचे उद्घाटन बाविस्कर यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्राचार्य डॉ. एम. डी. लॉरेन्स, वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख प्रा. संतोष शेणई आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल सुभाष खुटवड, दिगंबर दराडे, प्रज्ञा केळकर, अभिजित बारभाई, सुकृत मोकाशी या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.आगामी ५० वर्षे तरी प्रसारमाध्यमांची सत्ता कायम राहील. भारतासारख्या देशात वृत्तपत्रे वाढतच जातील, हे अधोरेखित करताना बाविस्कर म्हणाले, ‘‘पत्रकारितेच्या कुठल्याही माध्यमांमध्ये काम करताना पत्रकाराने वाचनाची आवड जोपासून ज्ञानाच्या कक्षा चौफेर रुंदावल्या पाहिजेत. वाचनातून एकांगीपणा दूर होतो. सातत्यपूर्ण वाचनाने माणसाचे जाणिवेच्या पातळीवर वाढ होत व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. वाचनामुळे आयुष्याचे संतुलन साधले जाते. पत्रकारांनी नेहमी सत्याचा पाठपुरावा करायला हवा. समाजातील परिवर्तनाच्या वाटांवर समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला पाहिजे. पत्रकाराला उत्तम व्यवस्थापक, प्रशासक व माणूस होता आले पाहिजे.’’प्रा. स्वप्नजा मराठे-पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले.
पत्रकारितेत शब्दसंग्रह व ज्ञानाला दुसरा पर्याय नाही - विजय बाविस्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 4:20 AM