" अजित पवारांसारखा वेळ पाळणारा अन् दिलेल्या शब्दाला जागणारा दुसरा माणूस नाही, पण... " ; चंद्रकांत पाटलांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 01:53 PM2021-08-02T13:53:56+5:302021-08-02T13:55:21+5:30
प्रत्येक विषयातच त्यावेळची वेळ मारून नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने सुरु आहे.
पुणे : अजित पवारांसारखा वेळ पाळणारा आणि शब्दाला जागणारा दुसरा माणूस नाही अशी ओळख आहे. पण आता एमपीएससीच्या जागा भरण्याबाबत विधिमंडळात दिलेला शब्द जर ते फिरवत असतील तर मग कठीण आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांना जोरदार टोला लगावला आहे.
पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले. पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधिमंडळ ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता ते जर आपण दिलेल्या शब्दावरून पलटी मारत असतील तर मग कठीण आहे. असे प्रत्येक विषयातच त्यावेळची वेळ मारून नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने सुरु आहे. हे अत्यंत खोटारडं सरकार आहे. निवडणूक होईपर्यंत हे सर्व चालतं, पण नंतर कळतं. महाविकास आघाडी सरकारला लोक धडा शिकवतील.
यापुढे असं केलं तर खपवून घेणार नाही; पाटलांचा इशारा
मेट्रो कंपनीचा आम्ही निषेध करतो. अशा प्रकारे दबावाखाली काम करायचं असेल तर आम्हालाही दबाव टाकता येतो. मोदींनी सर्व परवानग्या दिल्या, केंद्राने ११ हजार कोटी दिले आणि मोदींचा साधा फोटोही नाही ? आम्ही काय फुकटचं मागतोय का? तुम्हाला सगळं फुकट हवंय. माझ्या मतदारसंघात कार्यक्रम घेऊन मी नाही तिथे? यापुढे असं केलं तर खपवून घेणार नाही असा गर्भित इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण...
एमपीएससीची लेखी परीक्षा उत्तीर्ण होउन दोन वर्ष पदे न भरल्याने स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने पुण्यातील फुरसुंगी येथे राहत्या घरी आपले जीवन संपवले होते. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. तसेच भाजपने देखील विधिमंडळात महाविकास आघाडी सरकारला जोरदार लक्ष केले होते. मात्र, याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ३१ जुलै २०२१ पर्यंत रिक्त जागा भरण्यात येणार असल्याची जाहीर घोषणा केली होती. विधिमंळात केलेल्या घोषणेला कायदेशीर महत्व प्राप्त होते. दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उपमुख्यमंत्र्यांना या घोषणेचा विसर पडला आहे का ? असा संतप्त सवाल स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी उपस्थित केला जात आहे.