लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने वर्षानुवर्षे मतदार यादी दुरुस्ती व अपडेट करण्याची मोहीम हाती घेतली जाते. निवडणूक झाल्यानंतर व निवडणुका सुरू असताना देखील मतदार यादीत नाव नोंदवणे, पत्ता, नावात बदल करणे, मयत व्यक्तीचे नाव यादीतून वगळणे अशी सतत मोहीम सुरू असते, तरी देखील मतदार यादीतील चुका काही कमी होत नाही. याच एक भाग म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून छायाचित्र मतदार यादी करण्याचे काम सुरू आहे. परंतु आजही तब्बल ४ लाख ६ हजार ५८९ मतदारांचे यादीत छायाचित्र नाही.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शंभर टक्के मतदारांचे छायाचित्र असलेली मतदार यादी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. नव्याने मतदार यादीत नाव दाखल करताना छायाचित्र देणे बंधनकारक आहे. पण जुन्या हजारच मतदारांचे छायाचित्रच यादीत नाही. हे छायाचित्र मिळविण्यासाठी निवडणूक कर्मचारी घरोघरी जातात,पण तरी देखील या मतदारांकडून छायाचित्र उपलब्ध होत नाही. छायाचित्र नसलेले अनेक मतदार काही प्रमाणात बोगस देखील असू शकतात.
--------
जिल्ह्यातील मतदार : ७८,८७,८७४
छायाचित्र नसलेले मतदार : ४,०६,५८९
-----
विधानसभानिहाय आकडेवारी
मतदारसंघ एकूण मतदार छायाचित्र नसलेले मतदार
जुन्नर ३,०२,१७६ ३७०
आंबेगाव २,८९,७८९ १९३
खेड-आंळदी ३,३०,३२९ ६०३
शिरूर ४,११,६०२ ११,८११
दौंड ३,१५,५८३ १२,२६२
इंदापूर ३,२५,२२५ ७,४४६
बारामती ३,४९,७३४ ३४
पुरंदर ३,६९,४३२ ६,२५६
भोर ३,७३,०११ २,६१८
मावळ ३,५४,८७४ २,९२१
चिंचवड ५,२८,८६८ ७,६९७
पिंपरी ३,५७,८१२ १८,२५६
भोसरी ४,५१,३५७ ४,६७७
वडगाव शेरी ४,६१,९७६ ७२,६७२
शिवाजीनगर ३,०६,४२० ३०,७३८
कोथरूड ४,१३,३८९ ४७,१२०
खडकवासला ४,९५,९७६ ५३,५७८
पर्वती ३,५४,४७१ २५,१६२
हडपसर ५,१९,७१७ ५३,४३५
पुणे कॅन्टोन्मेंट २,९२,९०९ ३२,३७१
कसबा २,९३,२२४ १६,४७०
---------
छायाचित्र मतदार यादीवर अधिक भर
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार छायाचित्र मतदार यादीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार गेल्या वर्षांत जिल्ह्यात छायाचित्र असलेल्या मतदार यादीचे प्रमाण चांगले वाढले असून, शंभर टक्के छायाचित्र असलेली मतदार यादी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
- रुपाली रेडेकर, नायब तहसीलदार निवडणूक शाखा