पुणे : विविध पक्षांचे विधानसभेचे जाहीरनामे जाहीर झाले आहेत. यात समजातील विविध घटकांना आश्वासने देण्यात आली आहेत. परंतु एलजीबीटी समुदायाचे प्रश्न आम आदमी पक्ष वगळता कुठल्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात नसल्याने राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात देखील एलजीबीटी समुदाय वंचितच असल्याची खंत समपथिक ट्रस्टचे प्रमुख बिंदू माधव खिरे यांनी व्यक्त केली.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपले जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. या जाहीरनाम्यांमध्ये विविध आश्वासने देण्यात आली आहेत. तसेच कमी अधिक प्रमाणात सर्वच समुदयाचे प्रश्न त्यात मांडण्यात आले आहेत. परंतु एलजीबीटी समुदयाचे प्रश्न जाहीरनाम्यांमध्ये कुठेही घेण्यात आलेले नाहीत. याबाबत खिरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लाेकसभेला काही पक्षांच्या जाहीरनाम्यात एलजीबीटी समुदायाचे प्रश्न घेण्यात आले हाेते, परंतु विधानसभेच्या निवडणुकीच आम आदमी पक्ष वगळता कुठल्याही पक्षाने एलजीबीटी समुदायाच्या प्रश्नांना महत्त्व दिले नसल्याचे खिरे म्हणाले. या समुदायाला काेणी गृहीत धरत नसल्याचा आराेपही त्यांनी केला.
खिरे म्हणाले, राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात एलजीबीटी समुदायाला वंचित ठेवण्यात आले आहे. आम आदमी पक्ष वगळता कुठल्याही पक्षाने एलजीबीटीचे प्रश्न त्यांच्या जाहीरनाम्यात घेतले नाहीत. यावरुन एकतर आम्ही आमच्या मागण्या मांडण्यात कुठेतरी कमी पडलाे किंवा राजकीय पक्षांना एलजीबीटी समुदायाचे प्रश्न महत्त्वाचे वाटत नाही असे वाटते. एलजीबीटी समुदायासाठी भेदभाव विराेधी कायदा करणे आवश्यक आहे. या समुदायाबद्दलचा गैरसमज दूर करण्यासाठी राज्य सरकारच्या विविध संस्थांमध्ये जेंडर सेन्सिटीव्हीटीवर ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. या समुदायासाठी ठाेस धाेरण आखण्याची गरज आहे. परंतु असे हाेताना दिसत नाही. राजकीय पातळीवर या समाजाबद्दल संवेदनशिलता नाही हीच खरी शाेकांतिका आहे.