पुणे : मोठा गाजावाजा करीत आणलेल्या समान पाणी पुरवठा योजनेचा पुणेकरांना २४ तास पाणी पुरवठा करण्याचा उद्देशच नसल्याची कबुली पालिकेच्या अधिका-यांनी सजग नागरिक मंचाच्या ऑनलाईन चर्चासत्रात दिली. या योजनेचे डिझाईन तशा पद्धतीने करण्यात आलेले असले तरी एक समान पाणी देण्यासाठी ही योजना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्यासाठी किती पाणी द्यायचे हे सर्वस्वी पाटबंधारे विभागावर अवलंबून असल्याने २४ तास पाणी पुरवठा नेमका कधी होऊ शकेल याबाबत सांगता येत नसल्याचेही अधिकारी म्हणाले. त्यामुळे चर्चासत्रात सहभागी झालेल्यांनी या योजनेच्या कार्यक्षमतेबाबत शंका उपस्थित केली.
सजग नागरिक मंचाच्या मासिक सभेमध्ये या योजनेची माहिती देण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता नंदकुमार जगताप, कनिष्ठ अभियंता व्ही. सी. क्षीरसागर उपस्थित होते. तर, सजगचे अध्यक्ष विवेक वेलणकर, जुगल राठी, सारंग यादवडकर, कनीज सुखरानी आदी विविध क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी, क्षीरसागर यांनी योजनेची माहिती देताना, जलवाहिन्या, पाण्याच्या टाक्या, मीटर बसविणे याच्या नियोजनाबाबत सांगितले. तसेच, आजमितीस असलेले लिकेज बंद करणे, टाक्यांची धारण क्षमता वाढविणे, पाणी सोडण्याच्या वेळा निश्चित करणे यासोबतच नागरिकांचा ‘हेल्थ इंडेक्स’ वाढविण्याचा उद्देश असल्याचेही सांगितले. या योजनेद्वारे होणारा पाणी पुरवठा डिजीटाईज असून त्याचे जीआयएस मॅपिंग केले जाणार आहे. २०४७ सालापर्यंतची लोकसंख्या गृहीत धरुन योजनेचे नियोजन केल्याचे अधिका-यांनी सांगितले.
यावेळी, राठी, यादवडकर, वेलणकर आदींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मात्र अधिका-यांची तारांबळ उडाली. २४ तास पाणी देण्याकरिता किती पाणी गृहीत धरावे लागेल? याचे गणितच अधिका-यांना मांडता आले नाही.
====