लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. बरे झालेले इतरांंना संसर्ग करू शकतात का? त्यांना कार्यालयीन कामकाज करता येईल का? त्यांना पुन्हा कोरोना होण्याची शक्यता किती? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. बऱ्या झालेल्या रुग्णांपासून धोका नाही, पण तरीही काळजी घेणे गरजेचेच आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
* कोरोना रुग्ण बरा होऊन आल्यानंतर इतरांना संसर्ग करू शकत नाही. त्याच्यातील त्या आजाराच्या विषाणूंची त्याला व त्याच्यापासून इतरांंना संसर्ग देण्याची तीव्रता संपलेली असते.
* ही तीव्रता १० दिवसांनंतरच संपते, पण सुरक्षा म्हणून कमी आजारी रुग्णांसाठी १४ व मध्यम, तीव्र स्वरूपाचा आजार असलेल्या रुग्णांसाठी २१ दिवसांचा कालावधी शास्त्रीयदृष्टया निश्चित करण्यात आला आहे.
* कोरोनातून बरा झाला आहे, अशा रुग्णाची पुन्हा तपासणी केली तर ती पॉझिटिव्ह येण्याची शक्यता असते, पण ते विषाणू फॉल्स पॉझिटिव्ह असतात. त्यांचा संसर्गही होत नाही व रुग्णाला त्रासही नाही.
* बरा होऊन आलेल्या कोरोना रुग्णाला पुन्हा कोरोना टेस्ट करून घेण्याची गरज नाही.
* बरा होऊन आलेल्या कोरोना रुग्णालाच पुन्हा कोरोना होण्याची शक्यता कमी असते, कारण त्याच्यात भरपूर अँटिबॉडिज तयार झालेल्या असतात. हा परिणाम बरे झाल्यावर किमान ४ आठवडे, कमाल ६ महिने तरी टिकतो.
* बरा झालेल्या रुग्णाने लस घेणे आवश्यक आहे, पण ती ३ किंवा ६ महिन्यांनी घ्यावी व घेण्याआधी शरीरातील अँटिबॉडिज लेवल तपासून मगच घ्यावी.
* कोरोनाचे कमी, मध्यम, तीव्र असे प्रकार आहे. यातील मध्यम, तीव्र कोरोना रुग्णाला बरा झाल्यावर कोरोना होण्याची शक्यता नसते, मात्र कमी तीव्रता असलेला रुग्ण पुन्हा त्याची शिकार होऊ शकतो.
* यासाठीच बऱ्या झालेल्या रुग्णांनी मास्क, सॅनिटायझर वापरलेच पाहिजे, कारण त्यांना आजार झालाच तर ते त्वरित दुसऱ्याला संसर्ग पोहचवू शकतात.
डॉ. सुहृद सरदेसाई, कन्सल्टिंग फिजिशियन
---///
* बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णाला परत कोरोना होण्याचे प्रमाण फक्त ३ ते ४ टक्के आहे. कमी तीव्रतेचा आजार होता, तो थोड्या उपचारांनी बरा झाला अशा रुग्णांच्या बाबतीत ही शक्यता जास्त असते. पण तरीही बरा होऊन आलेल्या रुग्णाने काळजी घेणे आवश्यकच आहे. होम आयसोलेशन झालेल्या रुग्णांंनीही काळजी जास्त घ्यावी.
* रुग्णालयातून बरे होऊन घरी आलेल्या रुग्णाने लगेच लस घेऊ नये. कारण त्याच्या शरीरात आधीच अँटिबॉडिज असतात. अशा वेळी लस घेतली तर उपयोग तर नाहीच, शिवाय प्रकृतीतील गुंतागुंत वाढण्याची शक्यता असते.
* त्याच्यावर उपचार झाल्यामुळे तसाही त्याला पुन्हा तोच आजार होण्याची शक्यता नसते. त्यामुळे लस घेण्याआधी शरीरातील अँटिबॉडिजची तपासणी करून घ्यावी, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* कोरोनाचा संसर्ग वेगात होत असल्याने बरे झालेल्या व कोरोना झाला नाही अशांनाही काळजी घेणे गरजेचेच आहे. त्यामुळे मास्क, सॅनिटायझर, गर्दी टाळणे या सर्व सूचना सर्वांनीच काळजीपूर्वक पाळायला हव्यात. सध्या तेच सर्वांच्या हिताचे आहे.
डॉ. परवेज ग्रँट, संचालक, रुबी हॉल क्लिनिक
---///
* बरा झालेला रुग्ण त्याची सर्व दैनंदिन कामे, कार्यालयीन कामकाज व्यवस्थित करू शकतो. फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या अनेक डॉक्टरांना सुरुवातीच्या काळात कोरोना झाला, पण ते त्यातून बरे होऊन कार्यरत झालेही आहेत.
* कोरोना संसर्गावर बराच अभ्यास झाला आहे. बरा झालेला रुग्ण इतरांंना संसर्ग करू शकत नाही. मात्र कोरोना विषाणू हवेत फिरणारा आहे, तो बऱ्या झालेल्या रुग्णाच्या नाकात जाऊन तिथून दुसऱ्याला संसर्गित करू शकतो. त्यामुळे काळजी घेणे गरजेचेच आहे.
* वय वाढते तशी प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे प्रतिकारशक्ती किती आहे, त्याची तपासणी वाढत्या वयाचा विचार करता करून घेणे सुरक्षेचे आहे.
* लस तुम्हाला काही प्रमाणात सुरक्षित करत असते. पण सामूहिक सुरक्षा तेव्हाच निर्माण होईल ज्यावेळी आपल्या देशाचे ८० ते ९० टक्के लसीकरण होईल.
* त्यामुळे सध्या तरी बऱ्या झालेल्या रुग्णांसह सर्वांनीच मास्क, सॅनिटायझेशन, गर्दी टाळणे, सुरक्षित अंतर ठेवणे या नियमांचे पालन करायलाच हवे.
डॉ. अमित द्रविड, संसर्ग रोगतज्ज्ञ. नोबेल रुग्णालय