प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे :विनोद १ : ‘मी जेवायला बसणार होतो, तेवढ्यात बायको मला म्हणाली, ‘मी पण बसू का तुमच्या ताटात?’ मी गमतीनं म्हणालो, ‘मावशील का?’अन उपास घडला ना राव!’———विनोद २ :नवरा जेवताना बायकोला म्हणाला, ‘आज पोळ्या करपल्यात’तिने वळून त्याकडे रागाने बघितलं .... !!तो लगेच बोलला,फार छान लागतायत , ‘कुरुंम कुरुंम’———विनोद ३ :लहानपणीची अफवा...बेडकाला दगड मारला की मुकी बायको मिळणार.जाम घाबरायचो तेव्हा...‘आता वाटतंय, दगड मारला असता तर बरे झाले असते!’ ———विनोद ४ :नवरा आपल्या बायकोला घेऊन हॉटेलमधे जातो.नवरा : काय खाणार तू...?बायको : काही पण चालेल...नवरा : वेटर, अरे एक मेनूकार्ड आण रे...बायको : अहो दोन मागवा ना, मी पण तेच खाणार...!———व्हॉट्स अॅप, फेसबूक अशा माध्यमातून दररोज महिलांवरील विनोदांचा भडिमार होत असतो. प्रत्यक्षात विनोदाच्या माध्यमातून स्त्रियांवरील टीकाटिपण्णी, शेरेबाजी, ताशेरे, त्यांच्या हुशारीवर घेतलेला संशय आदी बाबी गांभीर्याने घेणे आवश्यक असताना याकडे विनोदाच्या अंगानेच पाहिले जाते. नवऱ्याला टोमणा मारणे ही क्रूरता असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला असताना महिलांवर होणारे विनोद हीसुध्दा अपमानास्पद बाब असल्याची भावना महिलांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, याविरोधात आवाज उठवण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याची वस्तूस्थितीही समोर आली आहे.बुधवारी ‘नवऱ्याला टोमणे मारणे ही क्रुरता-उच्च न्यायालयाचा निर्णय’ ही बातमी वाहिन्यांवर झळकली आणि सोशल मीडियावरुन वाऱ्यासारखी पसरली. फेसबूक, व्हॉट्सअॅपवर या निर्णयाबाबत बऱ्याच चर्चाही रंगल्या. उशिरा का होईना, पण न्यायालयाला पुरुषांच्या त्रासाची, हक्काची जाणीव झाली, अशा पद्धतीने प्रतिक्रिया उमटल्या. दुसरीकडे, महिलांवर विविध प्रकारचे विनोद सोशल मीडियामध्ये फिरत असतात. त्यामध्ये महिला पुरुषांवर गाजवत असलेले प्रभुत्व, व्यावहारिक ज्ञानाचा अभाव, त्यांनी घरात निर्माण केलेली दहशत, शारीरिक व्यंग अशा विविध विषयांवर टोमणे आणि टिकाटिपण्णी केलेली असते. कोणताही विचार न करता, केवळ हसण्यावारी नेऊन अनेकांकडून हे मेसेज फॉरवर्ड केले जातात. फॉरवर्ड करणाऱ्यांमध्ये अनेकदा महिलांचाही समावेश असतो. अशा मेसेजमधून स्त्रियांचे चारित्र्यहनन होत असल्याची केवळ कुजबूज केली जाते. मात्र, याबाबत आक्षेप घेण्यासाठी किंवा तक्रार दाखल करण्यासाठी महिला कधीच पुढाकार घेत नाहीत, अशी वस्तूस्थिती महिला वकिलांनी मांडली.‘महिलांवर होणारे विनोद ही त्यांच्या सन्मानाला लागलेली ठेचच असते. भारतीय राज्यघटनेने महिलांना समान हक्क बहाल केले आहेत. मात्र, विनोद, शेरेबाजी, सोशल मीडियावरील पोस्ट यातून महिलांची नाहक बदनामी करुन समानतेच्या मूल्यांनाच धक्का लागतो. महिलांचा अपमान करणारे वाक्प्रचार सर्रास वापरले जातात. या अयोग्य वागणुकीबाबत महिलांनी आक्षेप नोंदवल्यास हे प्रमाण नियंत्रणात येऊ शकते. मात्र, अशा प्रकरणात आजवर कोणीही तक्रार दाखल केल्याचे ऐकिवात नाही’, असे मत भारतीय महिला फेडरेशनच्या लता भिसे यांनी ‘‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.